सांगली : महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या मान्यतेने आणि बर्ड साँग एज्युकेशन रिसर्च आणि पब्लिकेशन क्लब सांगलीच्या पुढाकाराने ३६ वे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलन २३ आणि २४ डिसेंबरला शांतीनिकेतन लोक विद्यापीठाच्या निसर्गरम्य प्रांगणात संपन्न होणार असून त्याला जोडूनच २२ डिसेंबरला पक्षांची भाषा या विषयांवर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदही होणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे यांनी बुधवारी दिली.
संमेलनाचे उदघाटन, पश्चिम घाट पर्यावरण आणि संरक्षक राजेंद्र केरकर यांच्या हस्ते होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि संवर्धक माजी मानद वन्यजीव रक्षक तथा महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अजित ऊर्फ पापा पाटील हे असणार आहेत. तर ज्येष्ठ वन्य जीव अभ्यासात बीएनएचएसचे संचालक आणि सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक किशोर रिठे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सदर,संमेलनात भारती विद्यापीठाचे पर्यावरण शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ.इरच भरूचा, फेदर लायब्ररीच्या संस्थापिका इशा मुन्शी, आयसर पुण्याचे श्रेयस माणगावे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन दिवसीय संमेलनात पिसे व पिसारा या प्रमुख विषयांवर सादरीकरणे, शोध निबंध, विद्यार्थ्यांचे शोध निबंध, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक शरद आपटे यांची मुलाखत, सहली, वृक्षदिंडी, प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने अशा कार्यक्रमांची रेलचल असणार आहे. दरम्यान २२ डिसेंबरला पक्ष्यांची भाषा या विषयावरील परिषदेत डॉक्टर एरिच भरूचा, किशोर रिठे, इशा मुन्शि, शरद आपटे मार्गदर्शन करणार आहेत.