महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार असणारे प्रकल्प परराज्यात जात आहेत. ‘टाटा एअरबस’नंतर आता आता सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही परराज्यात गेला आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मोठे विधान केले आहे. राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेणारे तसेच राज्याचे सक्षमपणे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री राज्याला हवे आहेत. राज्यातील जनतेला अजित पवार यांच्यासारखे मुख्यमंत्री असावेत असे वाटत आहे, असे अनिल पाटील म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> ‘सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी…”
“राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असे मत राज्यातील आमदार, खासदारांचे असेल तर ते स्वाभाविक आहे. अजित पवार यांनी मागील अडीच वर्षांत चांगले काम केले. तीन पक्षाच्या सरकारला सोबत घेऊन त्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार चालवला. त्यामुळे नेत्यांसह राज्यातील जनतेलाही आपल्या राज्याचा मुख्यमंत्री हा इतर राज्यांचे नेतृत्व करणारा नकोय, असे वाटत आहे. येथील जनतेला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री असायला पाहिजे, असे वाटतेय,” असे अनिल पाटील म्हणाले आहेत. तसेच “राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याचा मुद्द्यावर बोलताना राज्यातील उद्योग परराज्यात जाणार नाहीत तसेच रिकामे उद्योग करणार नाही, असा मुख्यमंत्री राज्याला हवा आहे,” असेही अनिल पाटील म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील राज्य सरकारला घेरले आहे. “कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. गुंतवणूकदारांचा राजकीय स्थिरतेवरील आणि शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकट काळात सरकार मदत करेल यावरून विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि ढासळलेली प्रशासकीय व्यवस्था हे महाराष्ट्राचं अपयश आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी सॅफ्रन प्रकल्पाचा उल्लेख न करता केली आहे.