पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सुरू झालेली इंधन दरवाढ अजून कायम आहे. मंगळवारी (२९ जून) पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये जून महिन्यातील १६वी दरवाढ नोंदवण्यात आली. आज (२९ जून) पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३५ पैसे वाढ झाली. तर डिझेलचे दर लिटरमागे २८ पैशांनी वाढले. त्यामुळे आधीच गगनाला भिडलेल्या इंधनाच्या किंमतीमुळे भडका उडाला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक ओरंगाबादसह महत्त्वाच्या शहरात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली असून, या इंधन दरवाढीचे चटके सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागले आहेत.
पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ होण्याची मालिका सुरुच आहे. मंगळवारी इंधनाचे दर आणखी वाढले. पेट्रोलचे दर लिटरमागे ३४ पैसे, तर डिझेल लिटरमागे ३० पैशांनी महागले. त्यामुळे इंधन दरवाढीचा वणवा दिवसेंदिवस भडकताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही पेट्रोल दरांच्याच मार्गाने वाटचाल करताना दिसत आहे. मंगळवारी दरवाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ९८.८१ रुपयांवर गेले. तर डिझेलचे दरही प्रति लिटर ८९.१८ रुपयांवर गेले आहेत.
नव्या दरवाढीमुळे मुंबईतील पेट्रोलच्या दराचा भडका उडाला आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर लिटरमागे १०४.९० म्हणजे १०५ रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दरही शंभरीचा दरवाजा ठोठावताना दिसत आहे. मंगळवारी मुंबईतील डिझेलचा दर प्रति लिटर ९६.७२ रुपयांवर पोहोचला.
The price of petrol & diesel in #Delhi is at Rs 98.81 per litre and Rs 89.18 per litre respectively today
Petrol & diesel prices per litre – Rs 104.90 & Rs 96.72 in #Mumbai, Rs 99.82 & 93.74 in #Chennai, Rs 98.64 & Rs Rs 92.03 in #Kolkata pic.twitter.com/paiqhUZh3L
— ANI (@ANI) June 29, 2021
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर रुपयांमध्ये)
मुंबई : पेट्रोल – १०४.९, डिझेल- ९६.७२
पुणे : पेट्रोल- १०४.४८, डिझेल- ९४.८३
नागपूर : पेट्रोल- १०४.३४, डिझेल-९४.७५
नाशिक : पेट्रोल- १०५.२४, डिझेल- ९५.५६
औरंगाबाद : पेट्रोल- १०६.१४, डिझेल- ९७.९६
कोल्हापूर : पेट्रोल- १०५.००, डिझेल- ९५.३५
पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर ४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली. तेव्हापासून पेट्रोल ८.४० आणि डिझेल ८.४७ रुपयांनी महाग झाले आहे. देशातील मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूरू, नाशिक, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोल शंभर रुपयांपेक्षा जास्त दराने विकलं जात आहे.