महाराष्ट्र पोलिस दलातील शिपाई आणि बीड जिल्ह्यातील ललिता साळवे यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर ललित साळवे झाले होते. ३६ वर्षीय ललित साळवे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी २०२० मध्ये लग्न केले होते. आता १५ जानेवारी रोजी ललित साळवे वडील झाले असल्याची बातमी समोर येत आहे. साळवे दाम्पत्याच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. साळवे दाम्पत्याने या मुलाचे नाव आरुष ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्स या संकेतस्थळाने दिली आहे.
ललित साळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझा महिला ते पुरूष असा प्रवास हा खूपच संघर्षमय होता. या काळात अनेकांनी मला सहकार्य केलं. आम्हाला बाळ व्हावं, ही पत्नी सीमाची इच्छा होती. आता आम्ही एका गोंडस मुलाचे माता-पिता झालो आहोत, याचा मला आणि आमच्या कुटुंबियांना आंत्यतिक आनंद होत आहे.
हे वाचा >> …आणि पोलीस शिपाई ललिता साळवेचा ललित साळवे झाला
जून १९८८ साली बीडमध्ये जन्म झालेल्या साळवे यांनी पदवीचे शिक्षण घेतले. २०१० मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात महिला शिपाई म्हणून रुजू झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांना ते पुरुष असल्याचे कळले. साळवे जन्मत:च मुलगा म्हणून जन्माला आले होते. मात्र त्यांची जननेंद्रिये विकसित न झाल्याने ते स्त्रीप्रमाणे भासत होते. त्यामुळे घरामध्ये मुलगी समजूनच त्यांना वाढविण्यात आले. साळवेंची लहानपणापासून मुलगी म्हणून वाढ झाली असली तरी त्यांच्यामध्ये मुलाचे हार्मोन्स असल्याने वयात आल्यानंतर त्यांना आपण मुलगी नसून मुलगा आहोत, असे वाटत होते.
वाचा : काय आहे लिंगबदल शस्त्रक्रिया?
अखेर त्यांनी पोलीस खात्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागितली. आपण महिला नसून पुरुष असल्याचा त्यांच्या या अजब दाव्यामुळे त्यांना सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी २०१७ पासून न्यायालयीन लढा सुरू केला. अखेर त्यांना या लढ्यात यश आलं आणि शस्त्रक्रियेनंतर ‘ललित साळवे अशी नवी ओळख त्यांना मिळाली. सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर आणि त्यांच्या चमूने टप्प्या टप्प्यानं साळवे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये अशी शस्त्रक्रिया प्रथमच करण्यात आली होती.