सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर २५ पोलीस चेकनाक्यांवर कसून चौकशी सुरू आहे. त्याशिवाय गोवा बनावटी दारू आयात केली जात असल्याने करडी नजर ठेवली जात असल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. गोवा बनावटी दारू आयात करणारे रॅकेट व गोदामांची माहिती यंत्रणेला असूनही त्यावर कारवाई कशासाठी टाळली जात आहे, असा प्रश्न आम जनतेकडून विचारला जात आहे.
गोवा बनावटी दारू मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्र राज्यात आयात केली जाते. गोवा बनावटी दारूची वाहतूक करणारे मोठे रॅकेट आहे. मध्यंतरी कॅन्टर, कंटेनर, दुधाचे टँकर, कोकण रेल्वे व अन्य वाहनांतून गोवा बनावटी दारू नेताना कारवाई करण्यात आली होती.
गोवा राज्यात बनविली जाणारी गोवा बनावटी दारूला महाराष्ट्रात मोठी मागणी आहे. बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या या दारू निर्यातीवर अनेकजण आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाले आहेत. गोवा राज्यात अल्प किमतीत मिळणारी दारू महाराष्ट्रात मोठय़ा दराने विक्री केली जाते, वेळप्रसंगी मद्य बॉटलवरील स्टिकर काढून महाराष्ट्र राज्याची निर्मिती दाखविली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पोलिसांची व उत्पादन शुल्क खात्याची चेकपोस्ट, उत्पादनचे भरारी पथक गोवा बनावटी दारूच्या वाहतुकीवर कारवाई करण्यास आघाडीवर असते. गोवा बनावटी दारूची वाहतूक करणारी वाहने व गोदामाची ठिकाणे पोलिसांच्या गुप्त विभागाला माहिती असते. त्यामुळे चेकनाक्यावर गाडीचा सिग्नल मिळाल्यावर ती तपासली जात नाही.
गोवा बनावटी दारूचा निवडणुकींच्या पाटर्य़ाना मोठा फायदा होतो. निवडणुकांत मटण पाटर्य़ात मद्याचा पूर वाहिला तरच पार्टीचा आनंद लुटणारी एक जमात आहे. जिल्ह्य़ात सध्या नाक्यानाक्यावर वाहने तपासली जात असल्याने या दारूची निर्यात थंडावली असल्याचे सांगण्यात येते.
रत्नागिरीत रो रो सेवेत ट्रकमधूनच गोवा बनावटी दारू निर्यात करताना उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. त्याच पाश्र्वभूमीवर गोवा बनावटी दारू निर्यातीची वेगवेगळी युक्ती वापरली जात आहे.

Story img Loader