शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड करुन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे. शिवसेनेचे ३५ पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. पक्षासोबत निष्ठावान असलेले नेतेच बंड करून बाहेर पडल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यानंतर उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावनिक ट्वीट करत आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत असे सांगितले आहे.
“जात, गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. यात शिवसेनेच्या काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेऊन आपल्याच काही सहकाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर घेऊन जाऊन पक्ष श्रेष्ठंशी प्रतारणा केली आहे. यातील अनेक जण हे परत येऊ इच्छितात व या सगळ्या सहकाऱ्यां मध्ये पहिले हिमतीचे काम केले ते माझे मित्र व सहकारी आमदार कैलास पाटील यांनी स्वतः सगळा प्रसंग आज प्रेस समोर सांगितला. सत्ता येत राहते व जात राहते परंतु जे धैर्य व निष्ठा तुम्ही शिवसेना व आपल्या पक्ष प्रमुखांबद्दल दाखवली त्याची नोंद ही कायमस्वरूपी राजकीय इतिहासात झाली. कैलास व माझा अनेक वर्षांचा स्नेह अतिशय संयमी व मितभाषी असलेले कैलास पाटील हे पक्षाबद्दल व ठाकरे परिवाराबद्दल कायमच भावूक असलेले मी वेळोवेळी पाहिले आहे व त्याची प्रचिती पूर्ण राज्याला या दोन दिवसात आलीच आहे. आम्ही बाळासाहेबांना दैवत मानणारे त्यांच्याच पुत्राला या संकटसमयी एकटे सोडून कसे जाणार. आपण धाराशिवचा आमदार तर आहोतच पण सर्वप्रथम बाळासाहेबांचा मावळा आहे, हेच आमदार कैलास पाटील यांनी दाखविले,” असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
“सुनील प्रभूंपासून सुरुवात करणार”; एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल रुममध्ये काय घडलं?
“माझ्या मित्राच्या या निष्ठेबद्दल व धैर्याबद्दल आमदार कैलास पाटील यांना मनापासून सलाम. असे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी पूर्ण राज्यात आहेत ज्यांचा धर्म, जात व गोत्र फक्त शिवसेना आणि असे सर्व जण खंबीरपणे उद्धव ठाकरेंना साथ देणार आहोत, हे ही निश्चित. जात, गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना,” असेही निंबाळकर यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे यांच्या ‘खास’ मैत्रीत फुटीची बिजे
दरम्यान,शिवसेना आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिलेला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव शिंदे यांनी फेटाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे बोलताना बंडखोर आमदारांना समोरासमोर येऊन बोलण्याचे आवाहन केले होते. तसेच शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव देऊन बघावा, अशी चर्चा झाली होती.