महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तशा चर्चाही रंगल्या आहेत. अशात कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची माहिती दिली. तसंच ते राजकारणात येणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. २१ जून २०२२ या दिवशी जे बंड शिवसेनेत झालं त्यानंतर महाविकास आघाडी सरकार हे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडलं. तसंच शिवसेनेत ठाकरे विरूद्ध शिंदे असे दोन गटही पडले. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच शिवसेना हे पक्षनाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. तर धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदेंना दिलं आहे. अशात आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागणार याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे नऊ महिन्यांच्या युक्तिवादानंतर आता या आठवड्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार का? याविषयी चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशाला हा निकाल काय लागणार याची उत्सुकता आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल केव्हा लागेल हे आत्ता तरी सांगता येणं कठीण आहे. मात्र माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यापूर्वी हा निकाल लागेल. त्यामुळे सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंल आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वतीने सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला आहे. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला आहे.
राजकारणात येणार का? या प्रश्नावर काय म्हणाले निकम?
तुम्ही राजकारणात येणार का? असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना विचारला असता राजकारणात सध्या अस्थिरता आणि गढुळता आहे. त्यामुळे माझ्या सारख्या व्यक्तीने राजकारणात येणं योग्य नाही असं माझं मन मला सांगतं आहे असंही निकम यांनी स्पष्ट केलं. टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना हे वक्तव्य त्यांनी केलं आहे.