Maharashtra NCP News : शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यापासून राष्ट्रवादीत सुरु झालेल्या नाराजी नाट्याचा शेवट अजित पवार यांच्या बंडाने झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या ९ आमदारांवर राष्ट्रवादीकडून अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. यासह विविध घडामोडी आपण जाणून घेणार आहोत…
Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोड एका क्लीकवर...
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या याचिकेबाबत राहुल नार्वेकर यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (३ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड केले, तरी आपण न्यायालयात जाणार नाही, जनतेमध्ये जाऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. परंतु कायदेशीर लढाई अपरिहार्य दिसते. तसेच विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. शरद पवारांच्या गटाकडून करण्यात आलेल्या कारवाईला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर आलं आहे. यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा अजित पवारांनी केली. ते सोमवारी (३ जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. अशातच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा धक्का देत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केलं आहे. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष असतील, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
जयंत पाटील आणि तुमच्या बॅनरला काळे फासण्यात आलं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, "माझ्या तोंडाला काळे फासा, दगडे मारा काहीही केलं, तरी मला फरक पडत नाही. मी मैदानात लढणारा कार्यकर्ता आहे. आयुष्यभर लढत आलो आहे. आयुष्यभर लढत राहिल. माझ्या रक्तात गद्दारी नाही. या रक्तात फक्त शरद पवार आहेत. ८३ वर्षाच्या म्हाताऱ्याला परत कडकडीत उन्हात आणि पावसात आणून लढायसाठी उभा करणं हे माझ्या रक्तात नाही."
"शपथविधी झाल्यानंतर काही जणांनी विधाने केली होती, की कायद्यात न जाता जनतेत जाऊ. पण, रात्री १२-१२ वाजता पत्रकार परिषद घेऊन काही वेगळ्या घटना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला काहीही अर्थ नाही. आम्ही घेतलेली भूमिका योग्य, रास्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भल्याची आहे," असं अजित पवारांनी सांगितलं.
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पुणे शहर व जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे प्रतिस्पर्धी होते, पण आता एकत्र आले असले तरी दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडून येणे कठीणच दिसते.
गडचिरोली : अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. याचे हादरे गडचिरोलीलादेखील बसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रीपदाची शपत घेताच गडचिरोली भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आणि एक खासदार असताना इतर पक्षातील नेत्याची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. हा निर्णय घेताना जिल्ह्यातील एकाही नेत्याला विश्वासात न घेतल्याने ते खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत.
जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केलं आहे. सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार यांची गटनेतेपदी, तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे," अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
"ईडी आणि सीबीआयचा वापर करत लोकांवर दबाव टाकून पक्षात घेता, याला चाणक्य निती म्हणायची का? यांना नुसती घाण म्हणायची. एप्रिलपासून अजित पवार जाणार हे लोकांना माहिती होतं. त्यानंतर मेगा ड्रामा झाला. शरद पवारांनी पुस्तक प्रकाशनाच्या सभेत राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारणी बैठकीत मांडायला हवं होतं. पण, तसे न करता पुस्तक प्रकाशनाच्या सभेत राजकीय ड्रामा करून राजीनामा देता," अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
"आपल्या सगळ्यांचे गुरु एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. मी सुद्धा तुमच्यातील आहे. मला गुरु वगैरे अजिबात मानू नका. मी गुरु वगैरे नाही. सर्वांनी आनंदात रहा. आणि आपला परिवार मजूबत ठेवा," असं शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना म्हटलं आहे.
"शरद पवारांना काय बोलायचं, ते बोलले आहे. पण, राजकारणात बेरजेला महत्व आहे. सरकारमध्ये जे पक्ष आलेत, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशासाठी काय चांगलं करता येईल. याला जास्त महत्व आहे. अजित पवार, भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हे पाऊल आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा अनुभव महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी कामात येईल," अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक सहकाऱ्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती आणि पाठिंबा दिला. अपेक्षा होती, हे संघटन महाराष्ट्र मजबूत करावं. देशात भाजपाच्या माध्यमातून समाजा-समाजात, जाती-जाती आणि धर्मात एक वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. या सगळ्यांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणे. ही अपेक्षा सगळ्या सहकाऱ्यांकडून आहे. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर मोलाची कामिगरी केली. पण, ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्याबरोबर गेल्याने नवीन पिढीचा कार्यकर्ता नाउमेद होऊ नये. तो पुन्हा उभा राहावा म्हणून हा दौरा सुरु केला आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात बोलताना सांगितलं.
अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं स्पष्ट केलं आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। मी_साहेबांसोबत,” असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1675785890168442881
यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. "पहिला मोहरा परत..!," असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्वीट करत शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं अमोल कोल्हे यांनी जाहीर केलं. "जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। मी_साहेबांसोबत," असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
"आमदार कुठेही असले, तरी सर्वजण टीव्ही आणि परिस्थिती पाहत आहेत. ज्या पद्धतीने कराडमध्ये शरद पवारांना प्रतिसाद मिळत आहे. यानंतर प्रत्येक आमदाराला ही भीती वाटेल, की येणारे काळात शरद पवार दौरे सुरु करतील. आणि माझ्या मतदारसंघात सभा घेतील. त्यांनतर माझ्या मतदारसंघात वातावरण काय होईल," असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची ४ वाजता पत्रकार परिषद, खात्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
"कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नाही. पक्षाचे कट्टर मतदार होते, याचा सर्वाना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल त्या तडजोडी करायचं हे पेव फुटलं आहे. मला वाटतं लोकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याचा गरज आहे. लवकरच मेळावा घेणार आहे. तसेच, महाराष्ट्र दौराही सुरु करणार आहे. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शरद पवार सांगत असले तरी. दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे पाठवल्याशिवाय जाणार नाही. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीनंतर झाली. शत्रू कोण मित्र कोण कळत नाही," अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
"मध्यप्रदेशातील सरकार उलथवण्यात आलं. त्याठिकाणी जातीय प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्याचं सरकार आणलं. दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, हिमाचल आणि दक्षिणकेडील राज्यातही असे प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याचं काम करण्यात आलं आहे. जातीय विचारधाऱ्या असलेल्यांकडून देशाची कारभार पुढे नेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लथापालथ ही करण्याबद्दलची भूमिका याच प्रवृत्तींनी घेतली. दुर्दैवाने त्याला आमच्यातील सहकारी बळी पडले. फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहिल. पण, महाराष्ट्रातील शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, उलथापालथ करणाऱ्या शक्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही," अशा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेता जितका प्रभावी तितका सरकारवर अंकूश राहतो. महाराष्ट्रात आजवर प्रभावी विरोधी पक्षनेत्यांची परंपरा होती. मात्र अलिकडच्या काळात विरोधी पक्षनेतेच सरकारला साथ देण्याची किंवा सरकारमध्ये सामील होण्याची नवी प्रथा- परंपरा राज्यात रुजू लागली आहे.
"यशवंतराव चव्हाण यांनी नवी पिढी तयार केली. जिल्ह्या जिल्ह्यांत तरुणांचा संच उभा केला. सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी अखंड काळजी घेतली. आज यशवंतराव चव्हाण आपल्यात नाही आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला विचार आपल्यात आहे. त्या विचारांनी पुढे जाण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली आहे. आज महाराष्ट्र आणि देशात जात, धर्म आणि पंताचा आधार घेऊन संघर्ष निर्माण केला जातोय," असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवार यांनी प्रीतीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना केलं अभिवादन केलं आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, अंकुश काकडे आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे जिल्ह्यालाही बसले आहेत.
"शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक आहेत. समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहे. शरद पवार भक्कमपणे राष्ट्रीय विरोधी पक्षांच्या आघाडीत आहेत. महाविकास आघाडी तशीच राहणार आहे. काही माणसं गेल्यामुळे परिणाम होणार आहे. तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. अजित पवार असं करणार माहिती होते. फक्त वाटाघाडी चालल्या होत्या. आता सुद्धा अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द असल्याची आमची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन किंवा अध्यक्षांकडून विरोधी निकाल घेऊन आपोआप बाजूला गेले, की मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याचं माहिती आहे," असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यात विरोधी पक्षाची जागा घेण्याची काँग्रेसला संधी चालून आली आहे. फक्त आपापसात वाद घालणारे काँग्रेस नेते या संधीचा कसा लाभ उठवितात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून विरोधी पक्षातून थेट सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर आता अजित पवारांच्या या निर्णयावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ पोस्ट करत टोला लगावला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पाडली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना घेऊन अजित पवार थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या बंडावर मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
अदिती तटकरेंमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केला होता. त्यांचाच मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेना आमदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
अजित पवार यांनी पुन्हा एकदा अचानक राजकीय सूत्र हलवत थेट विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उडी घेतली. इतकंच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आपल्याबरोबर येण्यास भाग पाडलं आणि त्यांनाही मंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ते रविवारी (२ जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
"जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदांरांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा योग्य अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. अजित पवारांना किती आमदारांना समर्थन याची माहिती नाही," अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.