Maharashtra Breaking News Live Updates, 21July 2022 : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचं तत्व न पाळता निर्णय घेतल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
पावसाने राज्यात सर्वत्र हजेरी लावली असली तरी संततधार कमी झाली आहे, काही ठिकाणी तर पावसाने विश्रांती घेतली आहे. विदर्भातील पूर आता ओसरत आहे.
आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेले यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागलं आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. त्यानंतर आज (गुरुवार) सोनिया गांधी या चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर होणार आहेत. तर, दुसरीकडे ईडी कडून सुरू झालेल्या या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने ईडी व मोदी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
अशा विविध घडामोडींचे अपडेट्स हे एका क्लिकवर..
Latest Maharashtra News Today : राज्यातील राजकीय घडामोडी, पावसाचे ताजे अपडेट आणि इतर बातम्या एका क्लिकवर...
शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत एका ३० व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही आत्महत्या नसून मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भावानेच हत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाचा सविस्तर
करोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून सण तसेच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. मात्र या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहर्रम हे सण धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवीली जाणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाचा सविस्तर
मिठी नदीला येणारा पूर या कारशेडमुळ नव्हे, तर मुंबई महापालिकेने बेकायदेशीर बांधकांना परवानगी दिल्यामुळे येतोय, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
दखलपात्र गुन्हा घडल्याचे लक्षात येताच प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरुवारी केली. तसेच बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याबाबत मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने निकाली काढली. वाचा सविस्तर बातमी...
महागड्या मोबाइलच्या विक्रीची फेसबुक व समाज माध्यमांवर जाहिरात करून प्रत्यक्षात ग्राहकांना जुने मोबाइल पाठवल्याप्रकरणी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून सुमारे तीन हजार २०० मोबाइल जप्त करण्यात आले असून आरोपींनी देशभरात अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.
तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये ‘अभाविप’चे कार्यकर्ते आणि खाद्यपदार्थ विक्रेता यांच्यातील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हे प्रकरण एवढे वाढले की नागपुरहून निघालेल्या रेल्वेगाडीची साखळी खेचून ती थांबवण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...
जम्मू येथील मेंढर भागात मातृभूमीच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना प्राण गमावलेल्या कॅप्टन आनंद यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ‘हट ऑफ रिमेंबरन्स’ मध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅप्टन आनंद हे प्रबोधिनीच्या १३५ व्या तुकडीच्या रोमिओ स्क्वॉड्रनचे विद्यार्थी होते. लष्करी सेवेसाठीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राजपुताना रायफल्सच्या १५ व्या बटालियनमध्ये ते दाखल झाले होते. नुकतेच मेंढरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना कॅप्टन आनंद शहीद झाले. वाचा सविस्तर बातमी...
डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिन दयाळ या वर्दळीच्या रस्त्यावर ३० वर्ष जुनी हरी निवास नावाची इमारत असून ती धोकादायक झाल्याने तिचे सिमेंटचे लगदे हळूहळू पडत होते. मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती होती.
नियोजित गृहप्रकल्पातील सोळाव्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील जयदेवनगर परिसरात घडली. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाचा सविस्तर बातमी...
महिलेची सोनसाखळी चोरून पळ काढणाऱ्या एका सोनसाखळी चोराला एका सतर्क नागरिकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. माटुंगा परिसरात बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आरोपीला अटक केली.
जिल्ह्यातील महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम अंतर्गत वाहतूकीवरही होऊ लागला असून या कोंडीमध्ये बस आणि रिक्षा अडकून पडत आहेत. यामुळे थांब्यांवर पुरेशा बसगाड्या आणि रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या आणि सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांना बसत आहे.
परिवहन विभागाने वाहनांच्या तपासणीत सूसुत्रता आणण्यासाठी राज्यात स्वयंचालित वाहन तपासणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून मुंबईतील एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगारात हे केंद्र उभारण्यात येणार आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करून आलेल्या किंवा प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना टर्मिनसवर काही काळ तात्पुरता निवारा असावा यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर (एलटीटी) पॉड हॉटेल (कॅप्सूलच्या आकाराप्रमाणे खोल्या) उभारण्यात येणार होते.
भाजपाकडून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. मला तुम्ही एका भाजपा नेत्याचे नाव सांगा, ज्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. जेव्हा जेव्हा देशात भाजपाविरोधी वातावरण होते, तेव्हा तेव्हा ते गांधी परिवाराला त्रास द्यायला सुरूवात करतात. देशात जे सुरू आहे, ते योग्य नाही. हे सर्व बदलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांचे जावाई रॉबर्ट वाड्रा यांनी दिली आहे.
बदलत्या काळानुसार महाराष्ट्र सरकारने आपली मानसिकता बदलायला हवी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समाजसुधारकांच्या मूळ हस्तलिखित ग्रंथांच्या प्रकाशित खंडांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला सुनावले.
आई आजारी असून पैशाची खूप गरज आहे, असे सांगून पैशांची मागणी करत चार महिला आमदारांची गुगल पे वरून आर्थिक फसवणूक करणाऱ्या औरंगाबाद येथील मुकेश राठोड आणि सुनिता क्षीरसागर या बंटी-बबलीच्या जोडीला अटक करण्यात अखेर बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही जण स्पर्धा परीक्षेची तयार करत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. वाचा सविस्तर बातमी...
रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी महिलेकडील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना पौड फाटा चौकात घडली.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला पौड रस्ता भागातील शीलाविहार काॅलनी परिसरात राहायला आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेच्या चिखलोली येथील कचराभूमीतून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेजारचे रहिवासी आणि शेजारच्या गावातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे काही दिवसांपूर्वी लोकसत्ताने उघडकीस आणले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शस्त्रक्रियेनंतर कीर्तीकर आपल्या निवासस्थानी परतले आहेत. शिंदे यांनी कीर्तीकरांच्या तब्येतीची विचारपूस करत राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उल्हासनगर केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर राज्य सरकारने राज्यभरात एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी करत उल्हासनगर महापालिकेने गेल्या महिनाभरात २४ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
कल्याण पूर्वेत कोळसेवाडी, वालधुनी नदी, बाजारपेठ विभाग रस्ते, पदपथ अडवून फेरीवाले, व्यापाऱ्यांनी उभारलेली बेकायदा अतिक्रमणे जे प्रभागाच्या कारवाई पथकाने जमीनदोस्त केली. या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्ते, पदपथावरून चालणे अवघड झाले होते. याविषयीच्या तक्रारी वाढल्याने जे प्रभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
डोंबिवली- ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळील वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात हनुमान मंदिरा जवळील रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने या रस्त्याला कोंडीचा विळखा बसला आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्याने पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
तळजाई भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. वाचा सविस्तर बातमी...
करोना साथीनंतर हार्मोन्स बदलामुळे सहा ते नऊ वयोगटातील मुलींमध्ये अकाली पौगंडावस्था येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही मुलींना दहा वर्षाच्या आत मासिक पाळी येत असल्याचे आढळले आहे. बाई जेरबाई वाडिया रुग्णालय मुलींमधील या बदलांचा अभ्यास करीत असून रुग्णालयामार्फत अशा मुलींच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा जणू पालिकेने फेरीवाल्यांना आंदण दिला आहे अशा पध्दतीने फेरीवाले डोंबिवली पूर्व भागातील रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, पदपथ अडवून सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी फ आणि ग प्रभागातील सुमारे ३५ हून अधिक कामगार नियुक्त आहेत.
वरळी येथे २३ वर्षीय तरुणाने कुऱ्हाडीने गाड्यांची तोडफोड केली. तसेच या तरूणाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही त्याने कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात एक पोलीस जखमी झाला असून वरळी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली. वाचा सविस्तर बातमी...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुढील आठवड्यात २५ ते २९ जुलै या कालावधीत खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने केलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकांनी हे आदेश दिले आहेत.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पुढे सरकलेला नाही. कॉ. पानसरे यांची हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात विशेष तपास पथक अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) वर्ग करण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली असून राज्य सरकारला त्यावर काही तरी निर्णय घ्यावाच लागेल. हे असेच सुरू राहू दिले जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्य सरकारला सुनावले. तसेच ३ ऑगस्टपर्यंत पानसरे कुटुंबियांच्या मागणीवरील निर्णयायाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. वाचा सविस्तर बातमी...
नागपूर मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका कैद्याने मोक्काचा आरोपी झुल्फीकार जब्बार गणी या दुसऱ्या कैद्यावर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. वाचा सविस्त बातमी...
वारजे भागात खासगी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गजेंद्र श्रीधर घोळवे (वय ३८, रा. श्री शारदा निवास,आय.आय.टी रस्ता, खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी खासगी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.