Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी प्रतिक्रिया दिली असून इतिहासाची आठवण करुन दिली आहे. शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत अशी आठवण अजित पवारांनी करुन दिली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहील असा निर्णय घेण्यात आला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडाची आठवण करुन दिली. दरम्यान यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला असता त्यांनी ते घऱचं प्रकरण होतं अशी टिप्पणी केली.
शिवसेना आमदारांचं बंड गृहमंत्रालयाचं अपयश आहे का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
“शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत. मी राजकारणात आल्यानंतर हे शिवसेनेतील तिसरं बंड आहे. मी छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचं बंड पाहिलं. हे सर्व पाहिलं तर बंड करणारी प्रमुख व्यक्ती टिकते, पण नंतर इतर सहकारी निवडूनही येऊ शकत नाहीत इतकं शिवसैनिक कष्ट घेतात. शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान करतात असा मागील अनुभव आहे,” याची आठवण अजित पवारांनी करुन दिली. यावेळी अजित पवारांसमोर राज ठाकरेंच्या बंडाचा उल्लेख केला असता ‘ते त्यांच्या घरचं प्रकरण होतं ग बाई’ असं म्हटलं.
दरम्यान यावेळी अजित पवारांना हा शिवसेनेचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा डाव आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत जे काम केलं आहे, ते पाहता त्यांचा स्वभाव नाही. ते मोकळेपणाने मला असं करायचं आहे सांगतात”.
“आम्ही आघाडीला पाठिंबा दिला आहे. आम्ही पाठिंबा काढणार नाही. मुख्यमंत्रीपदालाही पाठिंबा दिला असून शेवटपर्यंत साथ देणार आहोत,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.