जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे याचं मला दु:ख वाटतं असं राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील आमदारांचे सूरतमध्ये, गुवाहाटीला असे हाल होतात. याच्या मागे कोण आहे. कोणती अदृश्य शक्ती, पक्ष आहे का? जे बोलतात पुन्हा येईन ते आहेत का? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कर्जतमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
“सूरतमधून विमानाने गुवाहीटाला नेतानाचे दोन तीन व्हिडीओ आले आहेत. व्हिडीओत काही जण डुलत होते, ते कशामुळे मला माहिती नाही. पण दुसरा व्हिडीओ फार भयानक होता. जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे याचं मला दु:ख वाटतं,” असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
यामागे कोणती अदृश्य शक्ती, पक्ष आहे का?
“महाराष्ट्रातील आमदारांचे सूरतमध्ये, गुवाहाटीला असे हाल होतात. याच्या मागे कोण आहे. कोणती अदृश्य शक्ती, पक्ष आहे का? जे बोलतात पुन्हा येईन ते आहेत का? पण कोणीही यामागे असलं तरी महाराष्ट्र माफ करणार नाही, थांबणार नाही, झुकणार नाही,” असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.
दादागिरीने तुम्ही मन, ह्रदय, लोकांना जिंकू शकत नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. “आज तुम्ही हिंदुत्व, शिवसेना, शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्याबाबत बोलत आहात. हीच हिंमत, निष्ठा असती; शिवसेनेचे रक्त असतं, जे दिलं आहे त्याची खात्री असती तर तुमचा पक्षप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला असता,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
“डोंगर, दरी, नदी पहायची असेल आमच्या सह्याद्रीला येऊन बघा”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “घाबरायचं तर किती..येथून सुरतला पळून जायचं. तिथून नितीन सरदेशमुख आणि कैलास पाटील हे आपले शूरवीर शिवसैनिक लढा देऊन परत आल्यानंतर नंतर गुवाहाटीला पळाले. आधी कोणाला गुवाहाटी माहिती नव्हतं, आता सर्वांना माहिती आहे. एक आमदार म्हणतो काय डोंगर, दरी, नद्या…डोंगर, दरी, नदी पहायची असेल आमच्या सह्याद्रीला येऊन बघा. आमच्या कर्जतला येऊन पहा”.
“आज इथे असते तर माझ्या बाजूला बसले असते. मातोश्रीवर असते तर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसले असते. पक्षात आपण त्यांना दोन नंबरची जागा दिली होती. इतका मान, सन्मान, प्रेम मिळत होतं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.