गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. १६ मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली. शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? याभोवती हे सगळं प्रकरण उभं राहिलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील २ ते ३ दिवसांत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका कधी निकाल येणार? याबाबत वेगवेगळे दावेही केले जात आहेत. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना सर्वोच्च न्यायालायातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी नियमावलीचा संदर्भ दिला आहे.
निकालाबाबत कधी समजू शकेल?
गेले काही दिवस रोज सकाळपासून निकालासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असून कधीही निकाल लागू शकतो, असंही म्हटलं जात आहे. मात्र, यासंदर्भात निश्चित अशी प्रक्रिया असल्याचं सिद्धार्थ शिंदे यांनी नमूद केलं आहे. निकालासंदर्भात एक दिवस आधी संध्याकाळी तारीख जाहीर होते, असं सिद्धार्थ शिंदे म्हणाले आहेत. “एक दिवस आधी तारीख जाहीर होते. उद्या निकाल लागणार असेल तर आज संध्याकाळी ७-८ च्या सुमारास आपल्याला कळतं”, असं ते म्हणाले.
१५ तारखेपर्यंत निकाल लांबणार?
ज्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली, त्यापैकी एक न्यायमूर्ती शाह १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी निकाल येत नाहीत, असं शिंदे यांनी नमूद केलं आहे. “न्यायमूर्ती १५ तारखेला निवृत्त होत आहेत. शेवटच्या दिवशी साधारणपणे निकाल येत नाहीत. पण या खंडपीठासमोर दिल्ली आणि केंद्र सरकारच्या सत्तासंघर्षाचा निकालही प्रलंबित आहे. त्याची सुनावणी १६ जानेवारीला संपली होती. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी १६ जूनला संपली आहे. त्यामुळे हा निकाल १५ मे अर्थात सोमवारपर्यंत लांबू शकतो”, असं ते म्हणाले.
“…तरच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयात हस्तक्षेप होऊ शकतो”, राहुल नार्वेकरांनी सांगितला नियम!
“सोमवारपर्यंत जर निकाल आला नाही नाही तर न्यायमूर्ती शाह १५ तारखेला निवृत्त होत आहेत. २० मे ते ३ जुलै न्यायालयाच्या सुट्ट्या आणि त्यानंतर न्यायमूर्ती कृष्णमुरारी ८ जुलैला निवृत्त होतील. त्यामुळे आता जर निकाल आला नाही ,तर दोन न्यायमूर्ती नव्याने खंडपीठात समाविष्ट होतील आणि नंतर पुन्हा सुनावणी होईल. मग ते खूप पुढे जाईल”, अशी भीतीही सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
कशी असेल निकाल वाचनाची प्रक्रिया?
“उद्या जर निकाल येणार असेल, तर तो ११ च्या सुमारास येईल. निकाल ज्यांनी लिहिलाय, ते एकच न्यायमूर्ती तो वाचून दाखवतील. त्यातला ऑपरेटिव्ह पार्ट न्यायमूर्ती वाचून दाखवतात. त्यावर नंतर सगळे न्यायमूर्ती सह्या करतात. त्यात दुमत असेल, तर ते न्यायमूर्तीही त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट वाचतात”, अशी माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.