शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासहित पक्षाच्या आमदारांनी बंड पुकारलं असल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटातील आमदारांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिला असून तोपर्यंत त्यांना अपात्र ठरवता येणार नाही. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. एकनाथ शिंदे आणि २१ आमदार सूरतमध्ये गेले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राजीनामा देत याची घोषणा करणार होते. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना रोखलं अशी सूत्रांची माहिती आहे.
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा विचार करत होते. उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण पुन्हा एकदा शरद पवारांनी मध्यस्थी केली.
उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा करण्याआधी शरद पवारांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यामुळेच उद्धव ठाकरेंचं फेसबुक लाईव्ह अर्धा तास उशिरा सुरु झालं असं कळत आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हमध्ये मी मुख्यमंत्री नको असल्यास समोर येऊ सांगावं, पद सोडेन असं आव्हान दिलं होतं. तसंच त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडला आणि मातोश्रीवर राहण्यास गेले. आपण मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडला आहे, पण जिद्द नाही असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा आहे. १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करु नये असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाकडून आमदारांना १२ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत
सुप्रीम कोर्टाला पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे हवी आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आम्ही निकाल देऊ असं कोर्टाने सांगितलं आहे. आमदारांना १२ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिली आहे. त्यामुळे १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही. तसंच ३९ आमदार, त्यांचे कुटुंबीय व मालमत्ता यांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंचं ट्वीट
सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं असून, “हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय” असल्याचं म्हटलं आहे.