Maharashtra Political Crisis News : मुंबईमधील नागपाडा येथे गणपती आगमनाच्या सोहळ्यादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नागपाडा येथील गणपती आगमनादरम्यान एका व्यक्तीने गोंधळ घातल्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीने गणपती आगमनाच्या वेळेस घातलेल्या गोंधळानंतर स्थानिकांनी विरोध करुन आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं भाकीत त्यांनी आपल्या ट्वीटरद्वारे केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते. मोहीत कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना विधान आलं होतं. यावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहीत कंबोज यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहीत पवार यांनीदेखील मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra Breaking News
Updates : गणपती आगमन सोहळ्याला मुंबईत गालबोट; मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हेही आक्रमक झालेले दिसले. विशेष म्हणजे निधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलत असताना सत्ताधारी बाकावरील काही आमदारांनी अडथळा आणल्यानंतर पवार चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी "अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?", असा सवाल केला.
भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेशा प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून हा कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर संप येथील पाणी गळती रोखण्यासाठी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे आणि विद्यार्थी निखिल भामरे या दोघांची त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी दाखल गुन्हे एकत्रित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने सोमवारी मान्य केली. केतकीविरोधात राज्याच्या विविध भागांत २२ गुन्हे, तर भामरेविरोधात सहा गुन्ह्यांची नोंद आहे.
शेतजमिनीच्या वाटणीच्या वादामध्ये विरोधात भूमिका घेतल्याने चुलत भावावर बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून केल्याबद्दल तीन सख्या भावांसह चौघा आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच मृताच्या चार वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रूपयांप्रमाणे आठ लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे. वाचा सविस्तर बातमी...
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरbणी कर्नाटकातील तरूणास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा आज (सोमवार) सुनावली. वाचा सविस्तर बातमी...
चेंबूरमधील खारदेव नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणावर चार दिवसांपूर्वी पूर्ववैमनस्यातून धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान रविवारी या तरुणाचा मृत्यू झाला. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
बारामतीत मुलीची छेडछाड करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी तिच्या वडिलांचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी आरोपीने "घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है", असं स्टेटस ठेऊन हत्या केल्याचं नमूद केलं. तसेच अशा अल्पवयीन आरोपांविरोधात कठोर कारवाईसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. ते सोमवारी (२२ ऑगस्ट) विधीमंडळ अधिवेशनात बोलत होते.
व्यवसायात भरभराट, पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन एका व्यावसायिकाने पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून व्यावसायिकासह, सासू, सासरे आणि मांत्रिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे राज्य सरकारकडून गोविंदांना खेळाडू आरक्षणातून सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आलेली असताना, दुसरीकडे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ या परीक्षेतून निवड झालेल्या १ हजार १४३ उमेदवारांना साडेतीन वर्षांनंतरही नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांमध्ये अस्वस्थता असून, तातडीने नियुक्ती मिळण्यासाठी या उमेदवारांकडून मंगळवारी (२३ ऑगस्ट) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने काल रात्री (रविवार) आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर तुफान गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाल्याचे दिसून आले.या दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिसांनी भोंग्यासाठी परवानगी दिलेली असताना डॉल्बीचा सर्रास दणदणाट करण्यात आला. एवढंच नाहीतर उपस्थित तरुणांनी गर्दीमध्ये कोयते नाचवत नृत्य केल्याचेही समोर आल्याने, याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर बातमी...
राज्यातील सत्ता नाट्यानंतर वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी जिल्हयात दाखल झाल्या आहेत. भावना गवळी यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शहरातील वाटाने लॉन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शहरात सर्वत्र फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर भाजपच्या नेत्यांचेच छायाचित्र अधिक असल्यामुळे शिवसेना शिंदे गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे पिंपरी येथे पुढील वर्षी ६ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील गंधारी पुला जवळील के. एम. अग्रवाल महाविद्यालया समोरील रस्त्यावर पोलीस उपायुक्तांचे विशेष पथकाने कारवाई करुन दुर्मिळ वन्यजीव प्रजातीमधील मांडुळ जातीचा साप एका टोळक्याकडून रविवारी संध्याकाळी जप्त केला. काळ्या बाजारात या सापाची ७० लाखाला विक्री करण्यात येणार होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
हनुमान चालिसाप्रकरणी जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटींचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उल्लंघन केले असून त्यांचा जामीन रद्द करा ही मुंबई पोलिसांची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी पोलिसांच्या अर्जावर सोमवारी निर्णय देताना त्यांची मागणी फेटाळली.
महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव आणि वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्या बदल्यांचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले होते. परंतु हे आदेश धुडकावून लावत दोघांनी बदल्या रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरु केली होती.
राज्यातील महापालिका निवडणुकांची झालेली प्रभाग रचना पुन्हा बदलली, कोणाकरिता बदलली, त्यावेळेला नगरविकास मंत्री कोण होते ? त्यांनी स्वतःच्या खात्याचा घेतलेला निर्णय स्वतःच बदलला याचा अर्थच हा आहे की आताचे सरकार हे भाजपाच्या हातातील कळसूत्री बाहुली बनली आहे, अशी टीका गुहागर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सरकारवर केला.
राज्य सरकारने दहीहंडीचा क्रिडा प्रकारामध्ये समावेश केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गात नाराजी पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील फर्ग्युसन रोडवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विटी दांडू, गोट्या, सापशिडी, भोवरा, तर महिलांनी मंगळागौरीचे खेळ खेळून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. वाचा सविस्तर बातमी..
गेल्या २५ वर्षांपासून अधिक काळ असलेली मुंबई महानगरपालिकेची सत्ता कायम राखण्याचे शिवसेनेपुढे यंदा कडवे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि भाजपचे आव्हान असा दुहेरी आव्हानांचा सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. त्यातूनच यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी सोपी नसणार हे मात्र निश्चित. वाचा सविस्तर बातमी...
मुंबईत विधानसभवनाच्या पायऱ्यांवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. "ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, ५० खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले", अशा अनेक घोषणा देत विरोधकांनी सरकारला घेरलं.
२०२१-२२ या वर्षात देशभरातील बँकांच्या स्वत:च्या तपासणीत दोन हजाराच्या १३ हजारांवर बनावट नोटा सापडल्या आहेत. यापेक्षा अधिक संख्येने पोलिसांनी देशभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केल्या आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. वाचा सविस्तर बातमी...
पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी न्यायालयाने संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच सर्वोच्च न्यायालयाने आता परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आरक्षणाशिवाय होणार असं चित्र दिसत आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...
“मागील ४० वर्षाच्या काळात कल्याण-शिळफाटा रस्ते बाधितांना शासनाने मोबदला दिला नाही. गेल्या चार वर्षाच्या काळात मोबदला देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने वेळकाढुपणा करुन हा विषय लालफितीत अडकविला. त्यामुळे येत्या महिनाभरात शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला नाहीतर कल्याण-शिळफाटा रस्त्यावर काटई भागात बाधित शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाईल.”, असा इशारा भिवंडी-कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. याचबरोबर, शीळफाटा मार्गावर लोकसत्ता मध्ये छापून आलेल्या बातम्यांचे मोठे फलकही उभारले असून, लोकसत्ताचे आभार देखील व्यक्त केले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयालय उपाध्याय या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. वाचा सविस्तर बातमी...
मध्य प्रदेशातील राजगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणानं टोल प्लाझावर काम करणाऱ्या महिलेस मारहाण केली आहे. पीडित महिलेनं आरोपीकडे टोलची मागणी केली होती. पण आरोपीनं आपण स्थानिक असल्याचं सांगून महिला कर्मचाऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर त्यानं टोल कर्मचारी महिलेस शिवीगाळ करत मारहाण केली आहे. मारहाण केल्याची घटना टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. सविस्तर बातमी
सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील एका हॉटेलवर अल कायदाशी संबंध असलेल्या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत २० हून अधिक लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. तर डझनभर लोकं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मोगादिशू येथील हयात हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या डझनभर लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सविस्तर बातमी
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच काही ट्वीट्स केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं भाकीत त्यांनी आपल्या ट्वीटरद्वारे केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते. मोहीत कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना विधान आलं होतं. यावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहीत कंबोज यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहीत पवार यांनीदेखील मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. सविस्तर बातमी
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रविवारी बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाऊन निर्धार मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात केलेल्या भाषणात विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे ‘काळू-बाळूचा तमाशा’ आहे. तर शहाजीबापू पाटील हे त्यातील ‘सोंगाड्या’ आहेत, अशी टीका केली आहे. विनायक राऊतांच्या या टीकेला आता बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी
महिला अत्याचारात कोणतीही जातपात पाहू नये.स्त्री म्हणूनच या प्रश्नाकडे बघितले पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. मग बिल्किस बानो असो की भंडाऱ्याचं प्रकरण असो किंवा निर्भया प्रकरण असो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिला अत्याचारप्रकरणात आपल्या कार्यकर्ताही असला तरी त्याला दयामाया दाखवू नये. तुमचे सरकार म्हणून आम्ही ओरडतो आणि आमचे सरकार म्हणून तुम्ही ओरडणार असा कोडगेपणा असू नये. सर्वांनी एकत्र येऊन महिला अत्याचाराविरोधात काम केले पाहिजे, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी सांगोला येथे घेतलेल्या सभेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. या टीकेला आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ फेम शहाजीबापू पाटलांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. मी जर सोंगाड्या असेल तर विनायक राऊत काय नाच्या आहेत का? असा प्रश्न शिंदे गटातील आमदार असणाऱ्या शहाजीबापू पाटलांनी विचारला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त