राज्यात २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी अस्तित्वात आली. काँग्रेस सत्तेत सहभागी झालेली असली, अनेक वेळा काँग्रेस नाराजी व्यक्त करतानाही दिसली. याच मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. नाना पटोलेंनी मांडलेल्या भूमिकेवरून आता भाजपाने “नानाजी, सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय?,” असं म्हणत काँग्रेसला दोन सवाल केले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना पटोले यांनी देशातील व राज्यातील विविध मुद्द्यांवर राजकीय भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारबद्दलही भाष्य केलं. “हे सरकार आमच्यामुळे आहे. आम्ही सरकारमुळे नाही,” असं या मुलाखतीत बोलताना नाना पटोले म्हणाले. याच विधानावर बोट भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पटोले यांना दोन सवाल केले आहेत.
केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं असून, त्यात त्यांनी नाना काँग्रेसच्या सत्तेतील स्थानाबद्दल मुद्दा उपस्थित केला. “नाना पटोलेजी, तुम्ही वाफा दवडवा इतर दोन सरकार चालवित आहेत. सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय नानाजी? सरकारमध्ये कॅाग्रेसला विचारतय कोण? काँग्रेस मागण्या करते दोन्ही पक्ष लक्षही देत नाहीत. एवढंच काय…सोनिया गांधींनी पत्र लिहिले उपयोग तरी शून्य,” असं म्हणत उपाध्ये यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे.
@NANA_PATOLE जी तुम्ही वाफा दवडवा इतर दोन सरकार चालवित आहेत..सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय नानाजी?
सरकारमध्ये कॅाग्रेसला विचारतय कोण?
काँग्रेस मागण्या करते दोन्ही पक्ष लक्षही देत नाहीत
एवढच काय
सोनिया गांधीनी पत्र लिहीले उपयोगतरी शून्यhttps://t.co/YpfdC9lXt6
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 24, 2021
नाना पटोले काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या स्थानाबद्दल नाना पटोलेंनी भूमिका मांडली होती. “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की, हे सरकार आमच्यामुळे आहे. आम्ही सरकारमुळे नाही. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं ते म्हणाले होते.