साताऱ्यातील मल्हार पेठ पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या इमारतीचा ई-भूमिपूजन कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी इमारतीच्या रंगावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत भाष्य केलं. रंग बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला. “अजित पवार इमारतीच्या रंगाबद्दल बोलले. मला बरं वाटलं, मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे. जे समोर दिसत. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इमारतीच्या रंगाचा संदर्भात राजकीय भाष्य केलं.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “भावना व्यक्त करणं सोपं असू शकतं, पण त्यापुढे जाऊन सांगायचं चांगल्या भावना असणं आणि त्या व्यक्त करून नाही, तर त्या प्रत्यक्षात आणणं खूप महत्त्वाचं आहे. आपण भावना व्यक्त करणारी लोक नाहीत. तर त्या प्रत्यक्षात आणणारी लोकं आहोत. अजित पवार इमारतीच्या रंगाबद्दल बोलले. मला बरं वाटलं, मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे. जे समोर दिसत. ते बघावं लागतं. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात. पण, हे रंग बदलण्यासाठी धाडस असावं लागतं. ते धाडस या सरकारमध्ये आहे. लोक रंग दाखवताहेत, ते आपण बघतो, त्याला काही अर्थ नाही. पण, एखादा रंग नाही, आवडला, तर ते बदलण्याचं धाडस सरकारमध्ये आहे.
हेही वाचा- दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार-उद्धव ठाकरे
अजित पवार काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, त्यांच्या हस्ते इमारतींचं उद्घाटन व्हावं आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहता यावं, असंच नियतीच्या मनात असावं. त्यामुळे पोलीस ठाण्याचं काम इतकं लांबलं. देर आये दुरूस्त आये. चांगल्या कामाची सुरूवात होतेय ही आनंदाची बाब आहे. ही कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजे. प्रेझेटेशनमध्ये इमारतीचा आणि पोलीस ठाण्याचा रंग मला आवडलेला नाही. पिवळा पट्टा आणि निळा पट्टा. ते एकदम बेकार दिसतं. काम पूर्ण होईल त्यावेळस चांगल्या पद्धतीने रंग त्याला देऊ. चांगला रंग देऊन इमारत उठावदार करता येते. त्या गोष्टीचा विचार सगळ्यांनी करावा. महाराष्ट्र पोलीस दलाला शौर्याची परंपरा आहे. पोलिसांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवली पाहिजे. वरिष्ठांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांची काळजी प्राधान्यानं घ्यायला हवी. राज्यातील पोलीस वसाहतींची अवस्था चांगली नाहीत. पण चांगली घरं देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे,” असं अजित पवार म्हणाले.