ठाकरे सरकारच्या स्थैर्याबद्दल शंका उपस्थित करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. राज्यातील विविध मुद्द्यांचा उहापोह करत पाटील यांनी सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत राज्यात भ्रष्टाचार वाढला असल्याचा दावा केला. “राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही. सत्ता किती काळ टिकेल याचा भरवसा वाटत नसल्याने सगळा भर कमाई करण्यावर आहे आणि राज्यात भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे”, अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. बैठकीच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या राज्यव्यापी बैठकीसाठी विविध जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना त्यांचे सरकार किती काळ टिकेल याची खात्री वाटत नाही, त्यामुळे ते वारंवार सरकार पाच वर्षे टिकेल म्हणून सांगतात. परंतु सत्ता उद्या जाईल, तर आज कमाई करून घ्या, असे या आघाडीच्या नेत्यांचे धोरण आहे. त्यांना सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. आघाडी जनतेसाठी निर्णय करत नसल्याने मराठा आरक्षण गेले तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. महाविकास आघाडीचे नेते कोडगेपणाने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत. या आघाडीने भ्रष्टाचाराचे टोक गाठले आहे तसेच खोटारडेपणाचेही टोक गाठले आहे,” असा हल्लाबोल पाटील यांनी केला.
“भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनं करून या सरकारवर अंकुश ठेवला आहे. भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावली आहे. भाजपाच्या दबावामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. शेतकरी, वीज ग्राहक, मराठा समाज, ओबीसी, वंचित घटक अशा विविध घटकांसाठी भाजपाने आंदोलने केली आहेत. भाजपाने महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडले नसते तर त्यांना राज्यात स्वैराचार करण्यास खुले रान मिळाले असते. सेवा हा भाजपाचा स्थायीभाव आहे. करोनाच्या महासाथीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अभिमानास्पद सेवाकार्य केले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तज्ञांच्या सूचनेनुसार तयारी करावी,” असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलं.