Maharashtra Polls : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. दिवाळी संपली की महाविकास आघाडी आणि महायुती दोहोंचे प्रचार सुरु होतील. या दरम्यान जागावाटपाचं घोडं एकदाचं गंगेत न्हायलं आहे. मात्र त्यातही कुठे नाराजी तर कुठे बंडखोरी तर कुठे पक्ष सोडून तिकिट देणाऱ्या ‘आपल्या’ पक्षात जाण्याचा जोर वाढला आहे. भाजपातले १७ इच्छुक असे आहेत ज्यांच्यापैकी कुणी अजित पवारांच्या पक्षात जाऊन तिकिट मिळवलं तर कुणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊन. आम्ही महायुती म्हणजे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. मात्र भाजपाने निवडणुकीच्या ( Maharashtra Polls ) जागांमध्ये १५२+ १७ अशी १६९ जागांची बाजी मारली आहे. ही संख्या भाजपाचे उमेदवार आणि त्यांच्या पक्षातून दोन मित्र पक्षांत गेलेल्या उमेदवारांची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाच्या १२ इच्छुकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आणि तिकिट ( Maharashtra Polls ) मिळवलं. तर चार जणांनी अजित पवारांच्या पक्षात जाऊन तिकिट मिळवलं. आरपीआयच्या कोट्यातून एक जागा मिळाली आहे. तो उमेदवार भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक ( Maharashtra Polls ) लढवणार आहे.

हे पण वाचा- Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या पक्षात भाजपाचे किती जण?

निलेश राणे- कुडाळ
संजय जाधव दानवे-कणंद
राजेंद्र गावित-पालघर
विलास तरे, बोईसर
संतोष शेट्टी-भिवंडी
मुरजी पटेल-अंधेरी पूर्व
शायना एनसी-मुंबादेवी
अमोल खताळ-संगमनेर
अजित पिंगळे-धाराशिव
दिग्विजय बागल-करमाळा
विठ्ठल लांघे-नेवासा
बळीराम शिर्सेकर-बदलापूर

या १२ जणांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकिट मिळवलं. हे मूळचे भाजपाचे उमेदवार होते. भाजपाच्या जागा जाहीर होताना हे उमेदवार शिवसेनेत गेले आणि त्यानंतर तिथून त्यांनी तिकिट मिळवलं. अजित पवारांच्या पक्षात कोण गेलं जाणून घेऊ.

अजित पवारांच्या पक्षात जाऊन तिकिट मिळवणारे चार जण कोण?

राजकुमार बडोले-अर्जुनी मोरगाव
प्रतापराव चिखलीकर-लोहा
संजयकाका पाटील-तासगाव
निशिकांत पाटील-इस्लामपूर

या एकूण १६ जागा झाल्या तर १७ वी जागा आरपीआयच्या कोट्यातून आहे. ती आहे अमरजित सिंग यांची. कलिनामधून ते निवडणूक लढवत आहेत.

मुरजी पटेल हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना अंधेरी पूर्वमधून तिकिट देण्यात आलं आहे. तर मुंबादेवीतून शायना एनसींना शिवसेनेने तिकिट दिलं आहे. शायना एनसी या काँग्रेसच्या अमीन पटेल यांना टक्कर देतील. भिवंडीतही भाजपाचे नेते असलेले संतोष शेट्टी यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकिट मिळवलं. संजना जाधव दानवे या भाजपाचे माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या. त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणुकीसाठी ( Maharashtra Polls ) तिकिट मिळवलं. तर निलेश राणे हे देखील नारायण राणेंचे पुत्र जे भाजपात केंद्रीय मंत्री होते. त्यांनीही शिवसेनेत जाणं पसंत केलं. ज्यादिवशी त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रॅली घेतली तेव्हाच त्यांना तिकिट देणार असल्याचं जाहीर केलं. अगदी याचप्रमाणे राजकुमार बडोले, संजय काका पाटील, निशिकांत पाटील यांच्यासह प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन तिकिट मिळवलं. त्यामुळे महायुती असली तरीही महाराष्ट्रात मोठा भाऊ ( Maharashtra Polls ) आपणच हे भाजपाने दाखवून दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra polls 17 bjp netas imported by ncp and shivsnea as election candidates scj