सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह बिगर मौसमी पाऊसाचा शिडकावा झाला. तो तुरळक प्रमाणात होता. हवामान खात्याने रात्री उशिरापर्यंत काही भागात पाऊस कोसळू शकतो असा अंदाज व्यक्त केला. दरम्यान दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने तापमान वाढले होते तर सकाळी हलकीशी थंडी जाणवत असे तर काही ठिकाणी दाट धुके पसरले होते. दरम्यान वादळीवाऱ्यामुळे वीज वितरण खंडीत करण्यात आल्याने सायंकाळी सात वाजल्यापासून नागरिक काळोखात राहिले. उशीराने वीज वितरण सुरळीत करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा , विजांचा लखलखाट,तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा शिडकावा झाला. आजच्या वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांनी वर्तविला होता. घाटमाथ्यावर आंबोली परिसरात देखील तुरळक बिगर मौसमी पाऊस झाला. रात्री दहा वाजेपर्यंत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या (५ मिमी पेक्षा कमी) पावसाची शक्यता आहे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहनही ग्रामीण कृषी मौसम सेवा मुळदे यांनी केले आहे.