Maharashtra Breaking News Today, 07 July 2022 : शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर तब्बल ४० आमदार भाजपासोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यापाठोपाठ आता भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेतील खासदार देखील पुढे येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढत असताना संजय राऊतांवर बंडखोरांनी सुरू केलेल्या आरोपांमुळे देखील त्यांच्यासमोरचं आव्हान अधिक खडतर झालं आहे. एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडावा इतके राजकारणी आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मान्सूननं राज्यात दिलासादायक हजेरी लावली आहे.

Live Updates

Maharashtra Live Updates Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

21:57 (IST) 7 Jul 2022
'ठाकरे सरकारला दोष देत नाही, पण…' देवेंद्र फडणवीस म्हणाले…

याआधी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने भाजपा-शिवसेना युती सरकारच्या योजना बंद केल्याचाही आरोप फडणवीस यांनी यापूर्वी अनेकवेळा केला आहे. मात्र आता सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारला दोष देणार नाही. राज्याच्या विकासासाठीचे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रण केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. वाचा सविस्तर

20:37 (IST) 7 Jul 2022
‘स्मार्ट प्रोजेक्ट’ला गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामकाजास प्रारंभ केला. आज मंत्रालयात दाखल होताच एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सध्या सुरु असलेल्या तसेच मागील काही प्रकल्पांचा आढवा घेतला. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अॅग्री बिझनेस सोसायट्या निर्माण करुन १९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या शितिवषयक प्रकल्पाला फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश देण्यात आले. वाचा सविस्तर

20:36 (IST) 7 Jul 2022
कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यावर चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामास सुरुवात केली. त्यांनी आज राज्यात सध्या सुरु असलेल्या तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील महापूर तसेच अतिवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. या योजनेचा डीपीआर तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ते बैठक संपल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. वाचा सविस्तर

18:45 (IST) 7 Jul 2022
“पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींकडून प्रयोग करणे शिका”

“विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरींकडून प्रयोग करणे शिकावे. त्यांनी जीवनात विविध यशस्वी प्रयोग केले आहेत.”, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) अकोला येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वाचा सविस्तर बातमी...

18:18 (IST) 7 Jul 2022
‘… तर विदर्भ शेतकरी आत्महत्यामुक्त होईल – नितीन गडकरी

“विदर्भातील शेतकऱ्यांनी दर्जेदार निर्यातक्षम कृषी उत्पादन घेण्याची गरज आहे. कृषी उत्पादनाच्या निर्यातीतून शेतकरी समृद्ध होऊ शकतो. सक्षम निर्यात आणि कृषी क्षेत्रात व्यापक रोजगार निर्मितीतून विदर्भ शेतकरी आत्महत्यामुक्त होऊ शकतो.”, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज(गुरुवार) येथे व्यक्त केले. वाचा सविस्तर बातमी...

17:53 (IST) 7 Jul 2022
वसईत पुराचा पहिला बळी; १७ वर्षीय तरुणाचा मृतदेह वाहत आला!

वसई-विरारमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पहिला बळी घेतला आहे. वसईच्या वळीव परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झाला असून वालीव पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:50 (IST) 7 Jul 2022
ठाण्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील होणार?

ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. ही गळती सुरु असतानाच आता ठाण्यानंतर नवी मुंबईतील (Navi Mumbai) जवळपास ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर

17:43 (IST) 7 Jul 2022
संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी काँग्रेसची निदर्शने

संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी अंध, अपंग, विधवा, निराधार तसेच वयोवृद्ध नागरिकांनी भर पावसात निदर्शने करत जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. वाचा सविस्तर बातमी...

17:32 (IST) 7 Jul 2022
"एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का?", विनायक राऊत यांचा टोला

एकनाथ शिंदे यांना स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी लगावला आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं असं आव्हानही विनायक राऊत यांनी दिलं आहे.

सविस्तर बातमी

17:25 (IST) 7 Jul 2022
विजय शिवतारे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक

शिवसेनेचे माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदारसंघातील तीनशेहून अधिक शिवसैनिकांनी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेतेच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. वाचा सविस्तर बातमी...

17:10 (IST) 7 Jul 2022
कल्याणमध्ये राष्ट्रीय आपत्ती दल बचाव पथकाची तुकडी दाखल

ठाणे जिल्हात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने खाडी, नद्यांच्या विळख्यात असलेल्या कल्याण, डोंबिवली परिसराला महापुराच्या पाण्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे शासन आदेशावरून राष्ट्रीय आपत्ती दल बचाव पथकाची एक तुकडी कल्याण-डोंबिवलीत दाखल झाली आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:57 (IST) 7 Jul 2022
ठाणे जिल्ह्याला उद्या हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’

भारतीय हवामान विभागातर्फे ठाणे जिल्ह्याला उद्या(शुक्रवारी) अतिवृष्टीचा (रेड अलर्ट ) इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील धोक्याच्या ठिकाण जाऊ नये अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही पद्धतीची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी..

16:53 (IST) 7 Jul 2022
औरंगाबादच्या नामांतरावर काँग्रेस हायकमांड नाराज?

राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. त्यांनी राज्यातील औरंगाबाद, तसेच उस्मामानाबाद शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दरम्यान, या नामांतरच्या मुद्द्यावरुन वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. वाचा सविस्तर बातमी

16:21 (IST) 7 Jul 2022
ठाण्यात ६७ पैकी ६६ नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत; नरेश म्हस्केंची माहिती

शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारत भाजपाच्या सोबतीने सरकार स्थापन केलेल्या आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील नगरसेवकांनी भेट घेतली. ठाण्यातील एकूण ६७ पैकी ६६ नगरसेवक हे एकनाथ शिंदेसोबत आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:40 (IST) 7 Jul 2022
पत्नीचा खून करून मेहुणीवर वार ; दारूड्या पतीला हडपसर पोलिसांकडून बेड्या

दारूच्या नशेत पट्ट्याने मारत असल्याची तक्रार आईकडे करणाऱ्या पत्नीचा पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली. यादरम्यान, सोडवण्यास आलेल्या मेहुणीवरही वार करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेसतरानळी येथे घडली. वाचा सविस्तर बातमी...

15:15 (IST) 7 Jul 2022
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात पाणी साचले

ठाणे शहरात आज (गुरूवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी भागातील निवासस्थान परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. हा परिसर जलमय झाल्याचे कळताच पालिका यंत्रणेची तारंबळ उडाली आणि त्यांनी याठिकाणी धाव घेऊन पंपांच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा उपसा केला. या भागात पावसाचे पाणी पुन्हा साचू नये, यासाठी पालिकेने याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप ठेवण्याबरोबरच त्याच्या संचलनासाठी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. वाचा सविस्तर बातमी...

14:09 (IST) 7 Jul 2022
“… मग नेमकं कोणत्या कारणासाठी विद्यार्थ्यांच्या भावनेशी महापालिका प्रशासन खेळत आहे?”

“मुंबईतील शाळा सुरू होऊन २५ दिवस झाले तरी महापालिकेच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगात ना नवीन गणवेश होता, ना नवीन वह्या, ना नवीन दप्तरे होती. शाळेचा पहिला दिवस नवीन गणवेश घालून सुरू व्हावा व नवीन दप्तर नवीन वह्यांचा सुगंध घ्यावा ही प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलांची नाजूनक भावना असते. त्याचा वेगळा आनंद असतो, पण मग नेमके कोणत्या कारणासाठी विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार महापालिका प्रशासन करत आहे?” असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:44 (IST) 7 Jul 2022
“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ असं मोठं विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पूजेसाठी दीपक केसरकर यांनीदेखील हजेरी लावली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. आजुबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावं असा सल्लाही त्यांनी दिला.

सविस्तर बातमी

13:16 (IST) 7 Jul 2022
विधान परिषदेत मतं फुटलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार? नाना पटोले दिल्लीत

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत आहेत. नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. राज्यात झालेलं सत्तांतर तसंच मतफुटीच्या मुद्द्यावर नाना पटोले पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. एबीपी माझाशी बोलताना नाना पटोले यांनी आपण हायकमांडकडे वेळ मागितली असून वेळ मिळाल्यास सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल असं सांगितलं आहे. तसंच हायकमांडने मतफुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

12:56 (IST) 7 Jul 2022
पुणे : उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरने केला बलात्कार

मणक्याच्या आजारावर उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर डॉक्टराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी डॉ़. योगेश लक्ष्मण वाल्हे (वय ४५, रा. अमोल एनक्लेव्ह कोटकर लेन, भाऊ पाटील रोड, औंध) याला अटक केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:51 (IST) 7 Jul 2022
सीएसएमटी - वडाळ्यादरम्यान दोन तास लोकल सेवा बंद राहणार

मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला असून खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने मध्य रेल्वेने उर्वरित ढिगारा हटविण्याचे आणि अन्य कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गुरुवारी दुपारी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी सीएसएमटी ते वडाळादरम्यान लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 7 Jul 2022
राज्यसेवा परीक्षा पद्धत, अभ्यासक्रमातील बदलांची २०२३ पासूनच अंमलबजावणी

राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांची अंमलबजावणी २०२४-२५पासून करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र जाहीर केल्यानुसार २०२३पासून अंमलबजावणीच्या निर्णयात कोणताही  बदल करण्याचा विचार नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरुवारी स्पष्ट केले.  वाचा सविस्तर बातमी...

12:36 (IST) 7 Jul 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात रिक्षाचालक रॅली काढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात रिक्षाचालक रॅली काढणार आहेत. यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावलेल्या रिक्षा उभ्या केल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी कोंडी झाली आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:55 (IST) 7 Jul 2022
VIDEO: महिला पोलीस कर्मचारी घसरुन जखमी होताच एकनाथ शिंदे मदतीला धावले

ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी पाय घसरुन जखमी झाली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीसाठी धाव घेतली. एकनाथ शिंदे यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याची विचारपूस करत तिला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही दिले. इतकंच नाही तर त्यांनी स्वत: ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सविस्तर बातमी

11:50 (IST) 7 Jul 2022
बदलापूर : बारवी धरणात २४ तासात ८ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर

गेल्या काही दिवसांपासून बारवी धरणक्षेत्राला जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. अखेर बारवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात १२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बारवी धरणात २४ तासात ८ दशलक्ष घनमीटर पावसाची भर पडली आहे. या पावसामुळे एकाच दिवसात बारवी धरणाचा पाणीसाठा ३४ टक्क्यांवरून थेट ३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:34 (IST) 7 Jul 2022
नागपूर सुधार प्रन्यासवर टांगती तलवार; मेट्रो-२ रुळावर?

फडणवीस सरकारने बरखास्त केलेले नागपूर सुधार प्रन्यास महाविकास आघाडी सरकारने पुनर्जीवित केले. परंतु, आता नवे शिंदे सरकार प्रन्यासचे अस्तित्व कायम ठेवते की बरखास्त करते, याकडे लक्ष लागले आहे. दोन वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित असलेला मेट्रो-२ चा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून भाजपा केंद्राकडे पाठपुरावा करण्याची शक्यता आहेत. वाचा सविस्तर बातमी...

11:30 (IST) 7 Jul 2022
“त्यांच्या नेत्यांनी एक कार्यशाळा घ्यावी आणि…”, बंडखोर आमदारांच्या आरोपांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे गटाचं नवीन सरकार अस्तित्वात आलं. ४० आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता नेमकं शिवसेनेत काय बिनसलं? यावर या बंडखोर आमदारांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची अरेरावी, हिंदुत्व आणि संजय राऊत हे मुद्दे शिवसेना सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं या आमदारांकडून सांगितलं जात आहे.

सविस्तर वाचा

11:14 (IST) 7 Jul 2022
पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील गुंड तडीपार

डेक्कन जिमखाना परिसरातील गुंडाला पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. राहुल राजेंद्र देवकर (रा. पवार क्वाटर्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:07 (IST) 7 Jul 2022
सेल्फी काढताना पाय घसरुन नदीत पडला, मित्र पळाले मात्र छोट्या भावाने पाण्यात उडी मारली; पण..

मित्रांसोबत नदीकाठी सेल्फी काढण्याच्या नादात एका १६ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. झारखंडमधील सिंगभूम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मित्रांसोबत सेल्फी काढत असताना नदीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सविस्तर बातमी

11:06 (IST) 7 Jul 2022
पावसामुळे पुन्हा लोकल मंदावली; मशीद रोड स्थानकाजवळ रूळालगत सरंक्षक भिंत कोसळली

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने गुरुवारी सकाळी जोर धरला. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकावर पुन्हा एकदा परिणाम झाला. लोकल सेवा विलंबाने धावत असल्याची माहीती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सकाळी ७.१५ च्या सुमारास मशीद रोड स्थानकादरम्यान रुळाजवळ संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. त्याचा ढिगारा त्वरित हटविण्यात आला. मात्र याचा फटका हार्बर रेल्वेला बसला. वाचा सविस्तर बातमी...

MAHARASHTRA WEATHER FORECAST

पाऊस (सांकेतिक फोटो)

Maharashtra Live Updates Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!