सांगलीमध्येही पावसाने उसंत घेतली तरी सांगली शहरासह वाळवा, मिरज, पलूस, शिराळा तालुक्यांतील १०४ गावांची महापुराशी झुंज चालू आहे. सांगलीमध्ये पाण्याची पातळी ५२ फुटांपर्यंत जाऊन स्थिरावण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र प्रशासनाचा अंदाज चुकला असून नागरिकांची धावपळ सुरु आहे. आतापर्यंत लाखाहून अधिक नागरिकांचं स्थलांतरित करण्यात आलं आहे. नदीकाठच्या बहुसंख्य गावांतील वीजपुरवठा खंडित झाला असून पूरबाधित क्षेत्रातील समस्या गंभीर बनली आहे.

पाऊसबळी १४५ वर

पाण्याची पातळी ५२ फुटांवर स्थिरावेल आणि ओसरेल असा अंदाज जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी वर्तवला होता. मात्र अद्यापही पाणी पातळीत वाढ सुरु आहे. यामुळे घरात थांबवलेल्या नागरिकांची ऐनवेळी पाणी आल्याने धावपळ सुरु झाली आहे. सध्या गणपती मंदिर, राजवाडा चौक, बस स्थानक, स्टेशन रोड, फौजदार गल्ली, शिवाजी पुतळा परिसरात पाणी आलं आहे. नदीकाठच्या शेतात पाणी आल्याने २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे.

उदयनराजे यांची पुरग्रस्तांसाठी फेसबुक पोस्ट; सरकार-प्रशासनाला दिला इशारा, म्हणाले…

मिरज कृष्णा घाट, ढवळी, अंकली, इनाम धामणी, सांगलीवाडी, हरिपूचा संपर्क तुटला आहे. तर भिलवडी, ताकारी, औदुंबर येथे पाणी ओसरु लागले. पूराचे पाणी फुटांपर्यंत वाढले असून उतार मात्र कमी वेगाने होत आहे. आयर्विन पूलावर पाणी पातळी ५४ फूट १० इंचावर पोहोचली आहे. दरम्यान अलमट्टीचा विसर्ग साडे तीनवरुन अडीच लाख क्युसेक करण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र या अतिवृष्टीने नद्यांना आलेले पूर आणि त्यातच धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे सांगली आणि कोल्हापूरभोवतीचा पुराचा विळखा कायम आहे. दरम्यान, या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांसह स्थानिक प्रशासनाने शनिवारी मोठी मोहीम उघडत हजारोंना सुरक्षित स्थळी हलवले.

Story img Loader