माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी केंद्रीय वन मंत्रालयाने पुढाकार घेतला असून तब्बल ३० कोटींचा खर्च करून महाराष्ट्र, राजस्थान व गुजरात या तीन राज्यात ‘माळढोक संवर्धन प्रजनन राष्ट्रीय प्रकल्पह्ण उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात माळढोक पक्षांची अंडी आणून प्रजनन केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय वन मंत्रालयाने तिन्ही राज्यांकडून प्रस्ताव मागितले आहेत.
माळढोकचे अस्तित्व हळुहळू कमी होत आहे. भारताचा विचार केला तर राजस्थान, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांमध्ये या पक्षाचे अस्तित्व आहे. त्यामुळे या पक्षाच्या संवर्धनासाठी खुद्द केंद्रीय वन मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी तब्बल ३० कोटींचा खर्च करून महाराष्ट्र, राजस्थान व गुजरात या तीन राज्यात ‘माळढोक संवर्धन प्रजनन राष्ट्रीय प्रकल्पह्ण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा प्रोजेक्ट प्राथमिक स्तरावर असला तरी केंद्रीय वन मंत्रालयाने तिन्ही राज्यांकडून तसे प्रस्ताव मागितले आहेत. अगदी सुरुवातीला गुजरात सरकारने या प्रकल्पात सहभागी होण्यास नकार दिला होता, परंतु आता या तिन्ही राज्यांनी होकार दर्शविला आहे. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ‘माळढोक संवर्धन प्रजनन प्रकल्पाह्णचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा प्रोजेक्ट केवळ या पक्षांचीच संख्या वाढविण्यासाठी तयार केला आहे.
राज्यात असाच प्रकल्प नाशिक, पुणे किंवा विदर्भातील वरोरा येथे होण्याची शक्यता आहे. कारण, जेथे माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व होते आणि जेथे तो सध्या अस्तित्वात आहे तेथेच या पक्ष्यासाठी वातावरण अनुकूल असते. त्यामुळे नाशिक, पुणे किंवा विदर्भातील वरोरा या तीनपैकी एका ठिकाणाची निवड होण्याची शक्यता आहे. माळढोकची सर्वाधिक संख्या राजस्थानात आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी राजस्थान येथून माळढोक पक्षांची अंडी आणली जाणार आहेत. त्यावर कृत्रिम प्रक्रिया करून माळढोकचे प्रजनन केले जाणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम प्राथमिक स्तरावर असले तरी केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकल्पाला प्राथमिकता दिलेली आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती माळढोक अभ्यासक डॉ.प्रमोद पाटील यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. हा प्रकल्प झाला तर या पक्षांना नवसंजीवनी मिळणार आहे. सध्या राज्यात या पक्ष्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यातही विदर्भातील वरोरा येथेच माळढोकचे अस्तित्व असल्याने विदर्भात हा प्रोजेक्ट आला तर अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मात्र, केंद्रीय वनमंत्री पुणे येथील असल्याने तेथेही हा प्रकल्प जाऊ शकतो, असे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रकल्प कुठेही झाला तरी माळढोक च्या संख्येत निश्चित वाढ होणार आहे. या प्रकल्पासाठी माळढोक तज्ज्ञांची मतेही जाणून घेतली जात आहेत. नुकतीच यासंदर्भात दिल्लीत एक बैठक झाली असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.