आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक ३.५ टक्क्यांनी घसरली असली तरी राज्यपातळीवर गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमाकांवर आहे. केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपीटी) गुरुवारी थेट परकीय गुंतवणुकीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट टाकून विरोधकांना टोला लगावताना महाराष्ट्रातील गुंतवणुकीची माहिती दिली आहे.

‘बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते’, असा टोला विरोधकांना लगावत देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. “एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये प्रथम क्रमांकावर राहिल्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल ३० मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

FDI News : थेट परकीय गुंतवणुकीला ओहोटी; ३.५ टक्क्यांनी घसरून ४४ अब्ज डॉलरवर सीमित

“२०२२-२३ या आर्थिक वर्षांत १,१८,४२२ कोटी तर २०२३-२४ या वर्षात १,२५,१०१ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे”, असेही ते म्हणाले आहेत.

देशाबाबत बोलायचे झाल्यास जानेवारी ते मार्च २०२४ या अंतिम तिमाहीत दरम्यान विदेशी गुंतवणूक ३३.४ टक्क्यांनी वाढून १२.३८ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ९.२८ अब्ज डॉलर होती. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकही २०२२-२३ मधील ७१.३५ अब्ज डॉलरवरून कमी होत, मार्च २०२४ अखेर ७०.९५ अब्ज डॉलरपर्यंत घटली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ८४.८३ अब्ज डॉलरचा परकीय गुंतवणुकीचा ओघ आला होता. सरलेल्या आर्थिक वर्षात, मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, केमन बेटे, जर्मनी आणि सायप्रस या प्रमुख देशांमधून गुंतवणुकीचा प्रवाह कमी राहिला, तर नेदरलँड आणि जपानमधून तो वाढला आहे.