पुणे, नागपूर : यंदाचा एप्रिल महिना गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक हवामान बदलाचा ठरला. राज्यात एप्रिलमध्ये गेल्या ६२ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

हवामानशास्त्र विभागाने १९६१ ते २०२३ या काळातील एप्रिल महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्या माहितीनुसार, एप्रिल १९६२ मध्ये २३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एप्रिल १९९४ मध्ये १५.६ मिलिमीटर तर एप्रिल १९९७ मध्ये १४.९ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. एप्रिल २०१५ मध्ये राज्यात १८.४ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा एप्रिल महिन्यात ४६.७ मिलिमीटर म्हणजे आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १९६२ मध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक पावसाच्या तुलनेतही यंदाच्या एप्रिलमध्ये झालेला पाऊस दुप्पट असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले. 

राज्यातील एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली. कोकण आणि गोव्यातील तुरळक पाऊसवगळता राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडला. राज्यात काही भागांमध्ये गारपीटही झाली.

विदर्भात वादळी पावसाचा आणि गारपिटीचा अधिक तडाखा बसला. १, ६, ७, ८, २०, २२, २५, २६ आणि २७ एप्रिलला वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक थंड अन् उष्णही

यंदाचा एप्रिल हा राज्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक थंडच नव्हे, तर सर्वाधिक उष्ण महिनाही ठरला. या महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान ४४.४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. या महिन्यात सलग २० दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर राहिले. त्यानंतर हवामानात अचानक बदल झाला आणि अवकाळी पावसाने तडाखा दिला. २७ एप्रिलला किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. ते गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक कमी तापमान होते.

पुण्यातही सर्वाधिक पाऊस

राज्यात पुणे शहर आणि परिसरातही यंदा एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस अनुभवल्याचे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या २० वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस यंदा पुणेकरांनी अनुभवला आहे.

पश्चिमी चक्रवातामुळे जगभरातच हे बदल घडत आहेत. साधारणत: फेब्रुवारी, मार्चमध्ये एक किंवा दोनवेळा पाऊस येतो. त्याला आंबेसरी असेही म्हणतात. यावेळी ही परंपरा मोडीत निघाली. दोन दिवसांपूर्वी चिमूर, ब्रम्हपुरी या शहरांत अविश्वसनीय ८६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. हा हवामान बदलाचाच परिणाम आहे. – प्रा. योगेश दुधपचारे, हवामान अभ्यासक व भूगोल विभाग प्रमुख, जनता महाविद्यालय, चंद्रपूर.

Story img Loader