राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्गाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत. शिवाय, राज्यात कडक लॉकडाउन देखील जाहीर कऱण्यात आलेला आहे. निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र असे असूनही रूग्ण संख्या सध्यातरी कमी होताना दिसत नाही. मागील २४ तासांमध्ये राज्यात ८३२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, ६६ हजार १९१ नवीन करोनाबाधित वाढले आहेत.

याशिवाय आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ४५० रूग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात ३५,३०,०६० जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८२.१९ टक्के आहे. सध्या राज्यात ६,९८,३५४ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत ६४ हजार ७६० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यातील मृत्यू दर १.५१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५७,४९,५४३ नमुन्यांपैकी आजपर्यंत ४२,९५,०२७ नमूने (१६.६८ टक्के) कोरना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ४३,३६,८२५ जण गृहविलगीकरणात असून, २९ हजार ९६६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

महाराष्ट्रातही नागरिकांना मोफत लस; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

राज्यातील वाढता करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक लॉकडाउन लागू केला आहे. इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य केंद्रीत केलं असून, १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. मात्र, १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली.

Story img Loader