कोल्हापूर : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन शनिवार व रविवारी वारणानगर येथे आयोजित केले असून अध्यक्षपद साहित्य अकादमीचे सदस्य, पानिपतकार विश्वास पाटील भूषविणार आहेत. परिषदेच्या वारणानगर शाखेने या संमेलनाचे आयोजन केले असून ते वारणा विद्यापीठाच्या विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्राच्या सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे साहित्यनगरीमध्ये होणार आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे, शाखाध्यक्ष प्रा के. जी. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संमेलनात प्रारंभी ग्रंथदिंडी, परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, कथाकथन, ग्रंथ पुरस्कार असे विविध कार्यक्रम होणार आहेत. स्वागताध्यक्ष आमदार विनय कोरे असून साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, मसाप कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, राजन मुठाणे उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा…ऊसदरप्रश्नी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी संयुक्त बैठक

खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते शनिवारी ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. ‘साहित्य चळवळीतील सहकाराचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, चंद्रकांत पाटील आणि विनोद कुलकर्णी सहभागी होणार आहेत. दुसऱ्या सत्रात वारणा बालवृंद गीत संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहे. सायंकाळी प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. रविवारी (८ डिसेंबर) पहिल्या सत्रात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. कृष्णात खोत यांची प्रकट मुलाखत होणार आहे. बालसाहित्यकार गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली बालसाहित्य मेळावा होणार आहे. चळवळीतील युवकांचा सहभाग हा परिसंवाद आणि आप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून त्यात अरविंद मानकर, अनिल शिणगारे, संपत जाधव, जयवंत आवटे सहभागी होणार आहेत.

हेही वाचा…आज केवळ तिघांचाच शपथविधी? एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी; महसूल आणि नगरविकास खाती? मंत्र्यांच्या नावांवर खल

बाळासाहेब लबडे, गुहागर यांना तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार, शिवाजी शिंदे, सोलापूर यांना सावित्रीअक्का कोरे काव्य पुरस्कार, महादेव माने, सांगली यांना शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कार, चंद्रकांत तथा राजू पोतदार, कोल्हापूर यांना विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार, शिवाजी चाळक पुणे यांना मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण समारोप सत्रात होणार आहे.