SC on Maharashtra Satta Sangharsh: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं असून त्यादरम्यान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्च न्यायालयात आज महाफैसला!

सर्वोच्च न्यायालयात आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. शिंदे गटातील १६ आमदार पात्र की अपात्र? विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती वैध की अवैध? विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाचं पुढे काय? किंवा राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेश योग्य की अयोग्य? यासंदर्भात आज न्यायालायकडून निर्णय किंवा टिप्पणी येणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“ज्या दिवसापासून केस दाखल केली, तेव्हापासून चर्चा चालू आहे. ही गोष्ट जूनमध्ये घडली. आज जवळपास मे महिना आहे. बहुतेकजण म्हणत होते की मे महिन्यात सुट्या लागतात. त्याआधी याबद्दलचा निकाल लागेल. त्यानुसार आता निकाल येतोय”, असं अजित पवार म्हणाले.

निकालाच्या काही तास आधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल?

“निकाल काहीही लागला तरी माझं स्वत:चं मत आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.घटनेनं त्यांना तो दिला आहे. त्यामुळे ते विचार करतीलच. पण कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला स्वत:ला वाटतं. मी काही मोठ्या वकिलांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आलं की यासंदर्भात बहुतेक विधिंमडळातली ही बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडूनच त्यांनी माहिती घेऊन निकाल द्यावा अशी शक्यता नाकारता येत नाही”, असं अजित पवारांनी टीव्ही ९ शी बोलताना नमूद केलं.

“…तोपर्यंत सरकारला धोका नाही”

दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारला धोका नसल्याचं विधान अजित पवारांनी केलं आहे. “आत्याबाईला मिशा असत्या तर काय म्हटलं असतं अशा चर्चांना काय अर्थ आहे? आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५पेक्षा जास्त बहुमत आहे. त्यामुळे ते सरकार चालवतायत. खूप जणांनी अशी वक्तव्यं केली आहेत की घटनाबाह्य सरकार वगैरे. जरी म्हणायला तसं असलं, तरी त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. सरकार ते चालवत आहेत. निर्णय ते घेत आहेत. बहुमताने लोकशाहीत जो अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळाला असतो त्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत आहेत. १४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra satta sangharsh supreme court verdict ajit pawar reacts pmw