Maharashtra Tourist In Jammu And Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत केलेल्या या हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या पर्यटकांमध्ये राज्यातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले शेकडो नागरिक अडकले आहेत. हल्ल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
अशात महाराष्ट्र सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. या विशेष विमानातून १०० पर्यटकांना परत राज्यात आणले जाणार आहे. या १०० पर्यटकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, कालही सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून परत आणल्या जाणाऱ्या ८३ पर्यटकांची यादी जाहीर केली होती.
एअर इंडियाचे विमान १०० पर्यटकांना आणणार
दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.”
दोन्ही विमाने सायंकाळी मुंबईत येणार
या पोस्टमध्ये पुढे असे म्हटले आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज २ विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान ८३ पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १००, असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.”
महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील अनेकजण अजूनही तिकडे अडकले आहेत. त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया येत असून मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडीही पाहुयात.