महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. शालान्त परीक्षांचे निकाल म्हणजे आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा. त्यामुळे ही पायरी पार केल्यानंतर करिअरच्या वाटा खऱ्या अर्थाने मोकळ्या होतात असंच अनेकांचं मत. पण, बऱ्याचदा अनेकांना या पायरीवर ठेच लागते आणि त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो.

अपयशाची ही ठेच काहीजण फारशी मनावर घेत नाहीत. पण, तुलनेने या अपयशाचा अतिशय गांभीर्याने विचार करणाऱ्यांचा आकडाही काही कमी नाही. दहावीच्या परीक्षेत आलेलं अपयश म्हणजे करिअरच्या सर्व वाटाच खुंटल्याचं चिन्हं, असाच अनेकांचा समज असतो. पण, मुळात तसं नाहीये. कारण, अपयशावर मात करत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांची असंख्य उदाहरण आपण पाहिली आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे.

दहावीच्या निकालांच्या पार्शभूमीवर मंजुळे यांनी फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या दहावीच्या निकालाचा फोटो पोस्ट करत दहावीच्या परीक्षेत आपल्यालाही अपयशाचा सामना करावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच दहावीच्या परीक्षेत दोनदा अपयश येऊनही आपल्याला त्यामुळे फारसा फरक पडला नव्हता. मुलात परीक्षा कोणतीही असो, दहावी, बारावी, एमपीएससी किंवा मग यूपीएससी. कोणतीही परीक्षा ही अंतिम नसते. आपल्या वाट्याला एकामागोमाग एक बऱ्याच संधी येतात. त्यामुळे कोणत्याही क्षणाला आनंदी राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच यश नसतं, हा सुरेख संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे.

वाचा : Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : तुम्हालाही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत?

सोशल मीडियावर सध्या दहावीच्या निकालांच्याच चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच मंजुळेंनी केलेली ही पोस्ट पाहता विद्यार्थ्यांना त्यांनी अपयशाकडे पाहण्याचाही एक सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे, असंच म्हणावं लागेल.

Story img Loader