महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एमएसबीएसएचएसई) महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की महाराष्ट्रातील दहावीचा निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर केला जाईल. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि निकाल तयार करण्याची कार्यपद्धती गेल्या आठवड्यात जाहीर केली होती.
राज्य मंडळाने अद्याप निकालाची नेमकी तारीख स्पष्ट केली नाही. दहावीच्या निकालाची तारीख काही दिवसांत जाहीर केली जाईल. यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा कोविड -१९ मुळे रद्द झाली. विद्यार्थ्यांची मागील कामगिरी विचारात घेऊन पर्यायी मूल्यांकन निकषांवर आधारित निकाल जाहीर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
निकाल कुठे पाहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृतरित्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.
सवलतीच्या गुणांची कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर
शाळेचा संकलित निकाल तयार करताना परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय प्राप्त गुण नोंदवावेत. सवलतीचे गुण, कला आणि क्रीडा सवलतीचे गुण नोंदवण्यात येऊ नयेत. त्यासंदर्भातील कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.