MSBSHSE 10th Result 2022 Updates: विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची (SSC result) आतुरता लागली होती तो निकाल आज (१७ जून) जाहीर होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यात मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबासाईटवर आपले व्यक्तिगत निकाल पाहता येत आहेत.

Live Updates

Maharashtra SSC Result 2022 Live : दहावीचा निकाल ९६.९४ टक्के, राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

13:45 (IST) 17 Jun 2022
शरद पवारांकडून दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

https://twitter.com/PawarSpeaks/status/1537709304702152704

शरद पवार म्हणाले, "दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन! आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करून आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न करावे, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल."

13:18 (IST) 17 Jun 2022
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी, परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केले आहे.

13:03 (IST) 17 Jun 2022
दहावी परीक्षेत राज्यात एकूण ११२ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले

राज्यात परीक्षेत तोतयेगिरी (डमी) करणारा १ विद्यार्थी, प्रत्यक्ष गैरप्रकार करताना पकडलेले विद्यार्थी ७९, परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासताना परीक्षकांना किंवा नियामकांना आढळलेले ३२ विद्यार्थी आहेत. यात धमकी, विनंती, ओळखीचं चिन्हं पेपरवर लिहिणे, उत्तर पत्रिकेचं पान फाडणे अशा प्रकारांचा समावेश आहे. या प्रकरणांची चौकशी होते. असे एकूण ११२ प्रकार परीक्षेत आढळून आले.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

12:53 (IST) 17 Jun 2022
राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के, तर १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के

राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे. १ ते १० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या एक आहे. पाच शाळांमध्ये १० ते २० टक्के निकाल लागला. ४ शाळांमध्ये २०-३० टक्के निकाल लागला आहे. १८ शाळांमध्ये ३०-४० टक्के, ३८ शाळांचा निकाल ४०-५० टक्के, ४१ शाळांचा निकाल ५०-६० टक्के निकाल, १२३ शाळांचा निकाल ६०-७० टक्के लागला. याशिवाय ७०-८० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२१, ८०-९० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १३३०, ९०-९९.९९ टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या ८ हजार ८०१ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२ हजार २१० इतकी आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

12:46 (IST) 17 Jun 2022
१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून, तर १० वीची २७ जुलैपासून सुरू होणार

१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत असेल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान असेल. १२ वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे, १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

12:04 (IST) 17 Jun 2022
२०२० च्या तुलनेत २०२२ चा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त

दरवर्षी मागील वर्षाशी निकालाची तुलना होते. २०२१ मध्ये अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल घोषित करण्यात आला होता. त्यामुळे २०२० ची तुलना २०२२ शी केली असता २०२० च्या तुलनेत २०२२ चा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त आहे. २०२१ मध्ये हा निकाल ९९.९५ टक्के होता.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:59 (IST) 17 Jun 2022
राज्यातील एकूण १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के

राज्यातील २२ हजार ९२१ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:55 (IST) 17 Jun 2022
दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के

दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:51 (IST) 17 Jun 2022
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४०

दहावीच्या परीक्षेत राज्यातून एकूण ८ हजार १६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ८ हजार २९ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ७ हजार ५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:47 (IST) 17 Jun 2022
उत्तीर्णतेत यंदाही पुन्हा मुलींचीच बाजी, मुलांपेक्षा १.९० टक्के अधिक निकाल

नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. अशाप्रकारे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:42 (IST) 17 Jun 2022
उत्तीर्णतेच्या टक्केवारीत कोकण विभाग अव्वल, तर नाशिक विभाग सर्वात मागे

कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९९.२७ टक्के इतकी आहे. सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० टक्के इतकी आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:39 (IST) 17 Jun 2022
पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७९.०६ टक्के उत्तीर्ण

राज्यातील ९ विभागातून एकूण ५४ हजार १५९ विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी (रिपीटर) नोंदणी केली. त्यापैकी ५२ हजार ३५१ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले. त्यापैकी ४१ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:32 (IST) 17 Jun 2022
राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८३,०६० इतकी आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

11:31 (IST) 17 Jun 2022
दहावीच्या परीक्षेत ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दहावी परीक्षेसाठी ९ विभागातून एकूण १५ लाख ८४ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ टक्के आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Maharashtra SSC Result 2022 Live, MSBSHSE 10h Result 2022

Maharashtra SSC Result

विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची आतुरता लागली होती तो निकाल आज (१७ जून) जाहीर झाला.

Story img Loader