ST Bus Fare Hike : एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, आता एसटीचा प्रवास महागला आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं जात होतं. यानंतर अखेर आता एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासंदर्भातील माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. याबरोबरच रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे. १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

“आज मी राज्याच्या प्रधान सचिवांबरोबर चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की गुरुवारी एक महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. आता एसटीची १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच एसटीची ही भाडेवाढ आजपासून लागू करण्यात येणार आहे”, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार

“१ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार आहे अशी माहिती मला सांगण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भातील फाईल माझ्यापर्यंत आलेली नाही. पण भाडेवाढीबाबतची फाईल माझ्यापर्यंत येईल. खरं तर एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. एसटीच्या तिकीट दरात दरवर्षी वाढ करणं गरजेचं असतं. कारण प्रवाशांना सुविधा देत असताना एसटी महामंडळाला खर्चही येतो. यामध्ये डिझेलचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. यातच एसटी महामंडळाची परिस्थिती आपण पाहिली तर दरदिवशी सुमारे ३ कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही”, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

एसटीची किती टक्के भाडेवाढ होणार?

“एसटीच्या भाडेवाढीसंदर्भातील परिपत्रक आज निघेल. तसचे एसटीची भाडेवाढ ही १४.९७ टक्के करण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने एसटी प्रवासात ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती बंद करण्यात येणार नाहीत. त्या सवलती सुरुच राहतील. तसेच महिलांना एसटी तिकीटातून ५० टक्क्यांची सूट देखील सुरु राहणार आहेत”, असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

रिक्षा आणि टॅक्सीची किती भाडेवाढ होणार?

“रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ही ३ रुपये प्रति किलोमीटर होणार आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीची ही भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू असणार आहे, असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra st bus fare hike big increase in st ticket price rickshaw and taxi travel will also become expensive gkt