महाराष्ट्र सरकारच्या महिला आयोगाने आषाढी आणि कार्तिकी वारीदरम्या महिला वारकऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षेकरीता नवीन निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार आता वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये यासंदर्भातील निर्देश वारी मार्गक्रमण करते त्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आलेत. यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे.
पत्रात काय आहे?
“महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते,” असा उल्लेख या पत्रात आहे.
कोणत्या सुविधा देण्यात येणार?
वारकरी महिलांची संख्या लक्षात घेत राज्य सरकारने वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश जारी केलेत. यामध्ये खालील चार निर्देश देण्यात आलेत…
१. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.
२. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे.
३.स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४.महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.
अशा सुविधा या वर्षाच्या वारीपासून महिला वारक-यांना उपलब्ध करून दिल्यास, पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु होण्यास मदत होईल, अशी आशा महिला आयोगाने या पत्रामधून व्यक्त केलीय.