राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असं असलं तरी करोना धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रशासन काळजीपूर्वक पावलं उचलताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लसीकरणावरही जोर दिला जात आहे. बंगळुरू आणि ओडिशात लहान मुलांना करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातही काळजी घेतली जात आहे. आज राज्यात ३ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाखा ८९ हजार ९३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ % एवढे झाले आहे. दुसरीकडे, आज राज्यात ४ हजार ७९७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९ लाख ५९ हजार ७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ९२ हजार ६६० रुग्णांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात तपासण्यास आलेल्या नमुन्यांपैकी १२.५४ टक्के जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५९ हजार ६४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६४,२१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासात २६७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३०८ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत एकूण रुग्ण बरे झालेल्या संख्या ७ लाख १८ हजार ८३ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. सध्या मुंबईत २ हजार ८३४ सक्रिय रुग्ण आहेत. करोना रुग्ण दुप्पटीचा वेग १,९२१ दिवसांवर पोहोचला आहे. ८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका होता.

देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी करोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे २३३७ सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार बाधितांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Story img Loader