भाजीपाला लागवड क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली असली, तरी उत्पादनाने ठेंगा दाखविल्याने भाजीपाला उत्पन्नाच्या आलेखावरून महाराष्ट्राची चक्क आठव्या स्थानी घसरण झाली आहे. उत्पादकतादेखील देशपातळीवरील सरासरीपेक्षा कमी आहे. भाजीपाल्याच्या कमतरतेमुळे भाव मात्र वाढत चालले आहेत. राज्यात जमीन, पाणी, भाजीपाला पिकासाठी अनुकूल वातावरण आणि इतर सुविधांची उपलब्धता आहे. विविध भाजीपाला पिकांची लागवड वर्षभर होऊ शकते. दुबार पिके, मिश्र व आंतरपिके म्हणूनदेखील ती उपयुक्त आहेत, पण हेक्टरी उत्पादन घसरत चालल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीचा कल कमी झाला आहे.
देशात भाजीपाला पिकाखालील क्षेत्राच्या बाबतीत पश्चिम बंगाल अग्रेसर असून उत्पादनात उत्तर प्रदेशाने प्रथम स्थान टिकवून ठेवले आहे, मात्र उत्पादकता तमिळनाडू राज्यात सर्वाधिक २८.९० मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे. महाराष्ट्र हे भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रात पाचव्या स्थानी असले, तरी उत्पादनात मात्र आठव्या जागेवर पोहचले आहे. भाजीपाल्याच्या क्षेत्रात राज्याचा वाटा ५.६६ टक्केआणि उत्पादनात ४.६१ टक्के वाटा दिसून आला आहे. कमी उत्पादकता ही मोठी समस्या राज्यासमोर आहे. महाराष्ट्राची भाजीपाल्याची उत्पादकता (१३.७० मे.टन / हेक्टर) ही देशाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा (१६.७० मे.टन / हेक्टर) कमी आहे. देशातील कांद्याच्या उत्पादनापैकी सर्वाधिक ३३ टक्केकांदा महाराष्ट्रात उत्पादित होतो, हे अव्वल स्थान वगळता इतर सर्व भाजीपाल्यांच्या बाबतीत अनेक राज्ये समोर गेली आहेत.
देशाच्या एकूण कोबी उत्पादनात राज्याचे कोबी उत्पादन केवळ ५ टक्के आहे. गेल्या वर्षांत २० हजार हेक्टर क्षेत्रात कोबीची लागवड करण्यात आली होती, ३ लाख ६० हजार मे.टन उत्पादन झाले. उत्पादकता २० मे.टन प्रति हेक्टपर्यंत खाली आली. टोमॅटो आणि वांगी उत्पादनाच्या बाबतीतही हीच स्थिती दिसून आली. देशाच्या एकूण टोमॅटो उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा केवळ ४ टक्केआहे. गेल्या वर्षी ५० हजार हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड झाली. ७ लाख ४० हजार मे.टन उत्पादन झाले. प्रति हेक्टरी उत्पादकता केवळ १४ मे.टन होती. ५ टक्केवाटा असलेले वांगी उत्पादन ४० हजार हेक्टर क्षेत्रात घेतले गेले, ४ लाख ९० हजार मे.टन उत्पादन आणि १४ मे.टन प्रति हेक्टर उत्पादकता निघाली. भाजीपाला पिकांच्या नियोजनात सुसूत्रता नसल्याने अनेक वेळा भाजीपाल्याचे उत्पादन एकाच वेळी बाजारात येते, दर कमालीचे घसरतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते, पण उत्पादन कमी असताना दलालांचा फायदा होतो. अनेक वेळा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही, हे दिसून आले आहे.
टोमॅटो, मिरची या पिकांचा उत्पादन खर्च साधारणपणे २५० ते ३७५ रुपये प्रति क्विंटल, तर कांदा, कोबी, फ्लॉवरचा खर्च ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल येतो. भाजीपाला व्यवस्थापनात साठवण क्षमतेला महत्त्व आहे, पण राज्यात साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. एकूण भाजीपाल्याच्या २० ते २५ टक्केभाजीपाला काढणीनंतरच्या प्रक्रियेअभावी वाया जातो, वाहतूक आणि साठवणुकीदरम्यान नासाडीचे प्रमाण जास्त आहे. प्रक्रिया उद्योगांच्या जागरूकतेअभावी भाजीपाल्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग कमी दिसून आला आहे. भाजीपाल्याच्या निर्यातीतदेखील शेतकऱ्यांचा वाटा कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा