राज्यातील एसटी बसवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बसेस बंद करण्याचे आदेश दिले. सरनाईक म्हणाले की, बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर शुक्रवारी रात्री ९.१० वाजता चित्रदुर्गात कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांनी चालक भास्कर जाधव यांचा चेहऱ्यावरही काळे फासले आणि त्यांच्यावर हल्ला केला, असं सरनाईक यानी सांगितले.
या कथित हल्ल्याप्रकरणी कर्नाटकात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “जोपर्यंत कर्नाटक सरकार या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत कर्नाटकला जाणारी बस सेवा पुन्हा सुरू केली जाणार नाही”, असे ते म्हणाले.
तसंच, एका मुलीला मराठीत उत्तर न दिल्याबद्दल कर्नाटकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावी मारहाण करण्यात आली. चित्रदुर्गात एमएसआरटीसी बसवरील हल्ला हा कंडक्टरवरील कथित हल्ल्याचा बदला होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही. सरनाईक म्हणाले की, एमएसआरटीसी बस चित्रदुर्ग ओलांडत असतानाच कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला.
बेळगावी येथे नेमकं काय घडलं?
बेळगावी येथे कंडक्टरवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली आणखी एका प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. कंडक्टरवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी ५१ वर्षीय कंडक्टर महादेवप्पा मल्लप्पा हुक्केरी यांनी डोळ्यात अश्रू आणत पत्रकारांना सांगितले की, सुलेभावी गावात एक मुलगी तिच्या मित्राबरोबर बसमध्ये चढली. ती मराठीत बोलत होती. त्यामुळे मी तिला सांगितलं की मला मराठी येत नाही, कन्नडमध्ये बोल. मी जेव्हा मराठी येत नाही असे सांगितले तेव्हा त्या मुलीने मला शिवीगाळ केली आणि म्हटले की मला मराठी शिकावे लागेल. अचानक मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर आणि संपूर्ण शरीरावर हल्ला केला”, असे कंडक्टर म्हणाला.