गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच राज्यातील ओमायक्रॉनच्या बाधितांचा आकडा वाढता आहे. आता महाराष्ट्रातही करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येत आहे. एकीकडे शाळा-कॉलेज बंद करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ लोकल प्रवासावरही निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता मनोरंजन विश्वावर पुन्हा निर्बंध येणार का? अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नुकतंच सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
करोनानंतर तब्बल दोन वर्षांनी चित्रपटगृह सुरु झाले आहेत. त्यातच आता ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच याबाबत अमित देशमुख यांनी माहिती दिली आहे. यावर अमित देशमुखांनी सध्या तरी नाट्यगृह, थिएटर बंद, मॉल बंद करायची आवश्यकता वाटत नाही, असे सांगितले आहे.
त्यापुढे अमित देशमुख म्हणाले, “सध्या चित्रपटगृह, हॉल किंवा मॉल्स बंद करण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटत नाही. पण लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही करायचे असेल तर त्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गोष्टींवर चर्चा केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेतील,” असे अमित देशमुख यांनी सांगितले.
राज्यात २४ तासांत २६,५३८ नव्या करोनाबाधितांची भर
बुधवारी दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या करोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली . त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार ०३२ इका झाला आहे. त्यापैकी ८७ हजार ५०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.