Maharashtra News Live, 04 June 2022 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना उन्हाच्या चटक्यांना सहन करावे लागत आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या अरबी समुद्रातील शाखेच्या प्रवासास पोषक वातावरण नसल्याने त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवापर्यंत येऊन थबकला आहे.

तडजोडीचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याने राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना की भाजपाचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होणार याचीच आता उत्सुकता आहे. महाविकास आघाडीला १६ तर भाजपाला अतिरिक्त २० मतांची आवश्यकता असल्याने जास्त आमदार कोण अधिक ‘गळा’ला लावतील त्यावरच दोन्ही पक्षांचे भवितव्य ठरणार आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

22:39 (IST) 4 Jun 2022
काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे

“काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील.”, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(शनिवार) दिली. वाचा सविस्तर बातमी...

21:58 (IST) 4 Jun 2022
सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत – शरद पवार

महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच ईडी, आयकर विभागाच्या धाडी पडतात, भाजपाच्या नेत्यांवर पडत नाहीत. तुम्ही सत्तेत राहून प्रशासकीय कामकाज देखील पाहीलेलं आहे, अशा पद्धतीने खुलेआम विविध यंत्रणा वापरणं हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर शरद पवारांनी उत्तर देताना ''हे अजिबात योग्य नाही. परंतु सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत असे राज्यकर्ते नाहीत.'' असं म्हणत टीका केली. वाचा सविस्तर बातमी...

20:48 (IST) 4 Jun 2022
जाहिरातीत सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन? केंद्र सरकारने केली मोठी कारवाई

सध्या एका बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एका खासगी कंपनीने बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमध्ये महिलांवरील बलात्काराला प्रोत्साहन दिले आहे, असा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला गेल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही वादग्रस्त जाहिरात सर्व माध्यमांवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी

20:47 (IST) 4 Jun 2022
मोठी बातमी! कोर्बेव्हॅक्स लसीला DCGIकडून हिरवा झेंडा

देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात मुखपट्टी लावण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना आता कोर्बेव्हॅक्स या लसीला डीसीजीआयने आपत्कालीन परिस्थितीत बुस्टर डोस म्हणून वापर करण्यास मान्यता दिली आहे. वाचा सविस्तर बातमी

20:45 (IST) 4 Jun 2022
पूर्वोत्तर राज्ये, दक्षिणेकडे मोसमी पावसाची हजेरी

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. वाचा सविस्तर बातमी

20:41 (IST) 4 Jun 2022
अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा

अमरावतीमध्ये एका ४५ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करून चक्क मानवी विष्ठा खायला लावण्यात आली आहे. वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे हा संतापजनक प्रकार घडला. वाचा सविस्तर बातमी

20:41 (IST) 4 Jun 2022
संपूर्ण राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

राज्यात सोमवार म्हणजेच 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

20:07 (IST) 4 Jun 2022
अडीच वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय संकटं विविध माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला - संजय राऊत

''मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय संकटं विविध माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण कोणी वाकलं किंवा झुकलं नाही. आपण लढतो आहोत, हा लढणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षे देखील सुखरुप पार पडतील आणि त्या नंतरच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी ठेवावी, हे मी खात्रीने सांगतो.'' असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

19:54 (IST) 4 Jun 2022
पुणे: प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी; प्रवेशासाठी मिळाली मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के रा‌खीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (६ जून) प्रवेश निश्चित करता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. सविस्तर बातमी

19:36 (IST) 4 Jun 2022
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट पाहून RSS चे प्रमुख मोहन भागवतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच यावर राजकीय विधानं केली जात होती. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी या चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सविस्तर बातमी

18:40 (IST) 4 Jun 2022
पुणे शहरासह जिल्ह्यात ७०० नवीन ई-सेवा केंद्रे; दाखल्यांसाठी होणारी वणवण थांबणार

ई-सेवा केंद्रांतून नागरिकांना विविध प्रकारच्या ४२ दाखल्यांसह अन्य सेवा दिल्या जातात. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे आणि उर्वरित ग्रामीण भागात सध्या १४३३ ई-सेवा केंद्रे कार्यन्वित आहेत. नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी आणखी ७०० केंद्रांची भर पडणार आहे. याबाबतची निवड प्रक्रिया सुरू असून, जूनअखेर ही केंद्रे कार्यन्वित होणार आहेत. सविस्तर बातमी

18:19 (IST) 4 Jun 2022
अवघ्या चार दिवसांनी मुलाचे लग्न असताना, पतीने केला पत्नीचा खून

मुलाच्या लग्नाच्या चार दिवसांपूर्वी कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना नागपुरातील लकडगंज हद्दीत जुनी मंगळवारी येथील ढिवर मोहल्ल्यात घडली. छाया बोरीकर (५२) असे मृत पत्नीचे तर रामदास बोरीकर (६०) असे आरोपी पतीचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:18 (IST) 4 Jun 2022
राज्यात दिवसभरात १ हजार ३५७ नवीन करोनाबाधितांची नोंद

ज दिवसभरात राज्यात १ हजार ३५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आज रोजी राज्यात एकूण ५ हजार ८८८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९१,७०३ झाली आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:47 (IST) 4 Jun 2022
भारतीय आंबा प्रथमच समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना, साडेसोळा टन आंब्यांची निर्यात

पुणे: भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शुक्रवारी (ता. ३) प्रथमच भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेला पाठवले आहेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले. सविस्तर बातमी

17:44 (IST) 4 Jun 2022
अमरावतीमध्ये हरणाचे मांस विक्री करणाऱ्यांना अटक; वनविभागाची कारवाई

हरणाचे मांस विक्री करणाऱ्या चार जणांना वनविभागाच्या पथकाने अटक केली. भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथे ही कारवाई करण्यात आली. पूर्णानगर येथे हरणाच्या मांसाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने पूर्णानगर येथील एका झोपडीवर छापा घातला. तेथून हरणाचे १.५ किलो मांस जप्त करण्यात आले. वाचा सविस्तर...

17:31 (IST) 4 Jun 2022
“घोडेबाजार म्हणणे थांबवा अन्यथा…”; अपक्ष आमदार जोरगेवार यांचा शिवसेनेला इशारा

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील अपक्ष आमदारांचे वजन चांगलेच वाढले आहे. शिवसेना आणि भाजपाकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा या निवडणुकीत ‘घोडेबाजार’ करेल, असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. अशातच, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘घोडेबाजार’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. वाचा सविस्तर...

17:16 (IST) 4 Jun 2022
महाराष्ट्राला मिळणार पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस

महाराष्ट्रात लवकरच पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावणार आहे. या रेल्वेद्वारे मुंबई-पुणे हा प्रवास आता केवळ अडीच तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली वंदे भारत रेल्वे पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत केंद्राकडून महाराष्ट्राला दोन वंदे भारत रेल्वे मिळण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:47 (IST) 4 Jun 2022
धनंजय मुंडेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची खास प्रतिक्रिया

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आगमी काळात राज्याचे मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल यावर भाष्य केले. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

16:01 (IST) 4 Jun 2022
कारागृह कॉन्स्टेबलच्या मुलीने पटकवला मिस इंडिया ग्लोबल पुरस्कार

नवी मुंबईतील वाशी इथे झालेल्या टॅलेटीका आयोजित स्पर्धेत बीडच्या भूमिका सावंतने मिस इंडिया ग्लोबलचा पुरस्कार पटकावला आहे. मूळची बीड येथील असलेल्या भूमिकाचे वडील सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल आहेत. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

15:57 (IST) 4 Jun 2022
एकात्मता व भाईचारा धुळीस मिळवण्याचा पंतप्रधान मोदींचा डाव उधळून लावणार-वृंदा कारत

स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा होता तो धुळीस मिळवण्याचा कार्यक्रम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारने सुरू केला आहे . या विरोधात आता सर्वांनीच एल्गार पुकारण्या ची गरज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी सातारा येथे व्यक्त केली. वाचा सविस्तर...

15:48 (IST) 4 Jun 2022
आधी बेदम मारहाण मग बंदूक रोखून…; पुण्यात मध्यरात्री बांधकाम व्यावसायिकाचं धक्कादायक कृत्य

पुण्यातील कोथरुड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोटारीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकाने तरुणाला बेदम मारहाण केली आहे. यानंतर आरोपीनं बंदूक रोखून तरुणाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. सविस्तर बातमी

15:48 (IST) 4 Jun 2022
पुण्यात दरोडेखोरांचा पोलिसांवर चाकू हल्ला; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी रोखलं पिस्तूल अन्…

खंडणी विरोधी पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना गाठलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पिस्तूल रोखून त्यांना मोटारीच्या खाली उतरण्यास सांगितले, पण दरोडेखोरांनी पोलिसांवर चाकूने हल्ला केला. यावेळी दोन अज्ञात दरोडेखोर पसार झाले आहेत. हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

15:26 (IST) 4 Jun 2022
पर्यायी इंधनावर नितीन गडकरी यांचे मोठे विधान

देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई वाढल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय. असे असताना पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन शोधले जात आहे. यावर भाष्य करताना आता पेट्रोल, डिझेल संपणार असून ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. राज्यात इथेनॉल निर्मिती करणारी एक अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलंय. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

15:25 (IST) 4 Jun 2022
कल्याणमध्ये एक हजार रुपयांमुळे वाद

हजार रुपयांच्या वादातून एका गॅरेज मेकॅनिकवर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिममध्ये घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चाकूने हल्ला करणारा आरोपी सागर माळवे याला अटक करण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

15:24 (IST) 4 Jun 2022
धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे विधान, म्हणाले

राज्यात महाविकास सरकारने सत्तेत अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. करोना संसर्ग, मंत्र्यांचे राजीनामे, नेत्यांवर झालेले वेगवेगळे आरोप आणि केंद्रीय तपास संस्थांकडून सुरु असलेली नेत्यांची चौकशी अशा संकटांना तोंड देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आपला कारभार हाकत आहे. असे असताना आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठे भाष्य केले आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

15:07 (IST) 4 Jun 2022
‘अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात’, आमदार रवी राणा यांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. अपक्ष आमदारांनी आपल्यालाच मतदान करावं, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. असं एकंदरित राजकीय वातावरण असताना अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमी

14:36 (IST) 4 Jun 2022
कोणताही प्रश्न आला तर महाराष्ट्राच्या मागे भक्कमपणे उभी राहणारी केंद्रातील व्यक्ती म्हणजे... : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभी असल्याचं सांगितलं. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

14:29 (IST) 4 Jun 2022
मशिदींसंदर्भातील वक्तव्यावरुन सरसंघचालकांवर ओवेसींची टीका; मोदी, फडणवीस, ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “सर्व विदूषकांचा…”

सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील बोलताना ‘‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका,” असं वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावरुन एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय. भागवत यांचं हे वक्तव्य प्रक्षोभक आणि दुर्लक्षित केले जाऊ नये असं असल्याचं ओवेसी म्हणाले आहेत. “एखादी गोष्ट लोकप्रिय नसताना त्यापासून स्वत:ला दूर सारायचं आणि ती लोकप्रिय झाल्यानंतर स्वीकारायची हा संघाचा जुना डावपेच आहे,” असं ओवेसींनी म्हटलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त

13:46 (IST) 4 Jun 2022
शेतात राबणाऱ्या वडिलांसाठी पाणी आणायला गेलेल्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू

वडिलांची तहान भागविण्यासाठी पाणी आणायला गेलेल्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा येथे घडली आहे. वाचा सविस्तर...

13:29 (IST) 4 Jun 2022
संतापजनक! दिल्लीत ९ वर्षीय मुलीवर कारखान्यात बलात्कार, ४६ वर्षीय आरोपी अटकेत

भारताची राजधानी दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीनं ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडित मुलीला आमिष दाखवून कारखान्यात घेऊन जात हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत सीलमपूर परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर बातमी

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Story img Loader