निर्बंध शिथिलीकरण रखडल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; आंदोलनाचा इशारा
मुंबई/पुणे : मुंबई, ठाण्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सहमती होऊन चार दिवस उलटले तरी निर्णयगोंधळ सुरूच आहे. निर्बंध शिथिलीकरणाबाबत रविवारीही आदेश निर्गमित न झाल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये असंतोष पसरला. दुकानांची वेळमर्यादा न वाढविल्यास ४ ऑगस्टपासून सर्व दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा इशारा पुणे व्यापारी महासंघाने रविवारी दिला असून, अन्य ठिकाणचे व्यापारीही आक्रमक झाले आहेत.
राज्यातील ११ जिल्हे वगळता आता करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाला परवानगी द्यावी, शक्य त्या ठिकाणी शाळा-महाविद्यालये सुरू करावीत, दुकानांना व उपाहारगृहांना वेळमर्यादा वाढवून द्यावी, अशा मागण्या सर्वपक्षीय मंत्र्यांनी केल्या होत्या. आरोग्यविषयक कृतीदलाशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथिल करण्याचा अंतिम निर्णय घ्यावा, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी कृतिदलाशी चर्चाही केली आणि त्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याबाबत सहमतीही झाली. मात्र, निर्बंध शिथिलीकरणाच्या निर्णयास विलंब होत असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
पुण्यात रविवारी व्यापाऱ्यांची बैठक झाली. सरकारने व्यापारी वर्गासाठी अनुकूल निर्णय न घेतल्यास ३ ऑगस्टला दुपारी बारा वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येईल. तसेच ४ ऑगस्टपासून सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
करोनाची पहिली लाट आल्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली. संपूर्ण देशभरातील व्यापारी, व्यावसायिक डबघाईला आले. नैराश्यातून व्यापारी सावरले. त्यानतंर दुसरी लाट आली. पाच एप्रिलपासून पुन्हा व्यापारी दुकानांवर निर्बंध लागू करण्यात आले. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. बाधितांची संख्या आणि मृत्युदर विचारात घेऊन दुकाने बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. मात्र, आता करोनाबाधितांची संख्या आणि मृत्युदर आटोक्यात आलेला असला तरी व्यापारी दुकानांवरील निर्बंध कायम आहेत. व्यापारी दुकानांना शिथिलता द्यावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, असे रांका यांनी सांगितले.
व्यापारी मेटाकुटीला
’निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. कर्मचारी वर्गाचे वेतन, दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, वीजदेयक, घरखर्च अशा अडचणींना व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
’शासनाकडून कोणतेही सहकार्य केले जात नसल्याने व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे.
’व्यापारी वर्ग, कर्मचाऱ्यांना मुबलक प्रमाणावर लसपुरवठा होत नाही. त्यांचे
लसीक रणही खोळंबले असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि महेंद्र पितळीया यांनी सांगितले.
प्रतीक्षा कायम
करोना निर्बंध १ ऑगस्टपासून शिथिल होतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे शुक्रवारी आदेश निर्गमित होण्याची शक्यता होती. मात्र, शिथिलीकरणाच्या विविध निर्णयांची वेगवेगळ्या भागांत अंमलबजावणीसाठी निकष आखणे, कमी रुग्ण असलेल्या जिल्ह्यांतून जास्त रुग्ण असलेल्या भागांत किंवा उलट प्रवास अशा विविध गोष्टींबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने रविवारीही आदेश निघाला नाही.