महाराष्ट्रामध्ये अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली असून त्यावर आधारीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकूण पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच जिल्ह्यांमध्ये प्रवासासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. खासगी गाड्या, टॅक्सी किंवा बसने लांबचा प्रवास करण्यासंदर्भातील नियमांमध्ये झालेला हा बदल आणि हे स्तर नक्की काय आहेत जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कशा पद्धतीने करण्यात येणार जिल्ह्यांची विभागणी आधी ते पाहूयात…

पहिला गट

ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट

पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट

पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

नक्की वाचा >> Maharashtra Unlock: लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्रायव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या

ई पासचे नवे नियम काय आहेत?

पहिला गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यामध्ये वाहतूकीसाठी परवानगी देण्यात आली असून त्यासाठी ई पासची गरज पडणार नाही. मात्र पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांमधून प्रवास करताना पाचव्या गटातील म्हणजेच संसर्गाचा धोका अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असल्याच ई पासची गरज लागणार आहे.

दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांनाही हाच नियम लागू आहे. संसर्गाचा धोका अधिक असलेल्या जिल्ह्यांमधून प्रवास करायचा असल्याच ई पास आवश्यक असणार आहे. पाचव्या गटातील जिल्हे वगळता इतर गटातील जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी मूभा देण्यात आली आहे.

पाचव्या गटातील जिल्ह्यांमध्ये ई पासची सक्ती कायम राहणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटामध्ये मोडतात. या जिल्ह्यांमधून बाहेर जाताना किंवा या जिल्ह्यांमध्ये येताना ई पास आवश्यक असणार आहे. या जिल्ह्यांमधून प्रवास करण्यासाठीही ई पास लागणार आहे. जिल्ह्यातील व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी काही विशेष कारणांसाठीच सवलत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय कारणांसाठी किंवा अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी प्रवास करण्यासाठी ई पास दिला जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra unlock inter district travel e pass rules scsg