राज्यातील करोना संसर्ग ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजापासून अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यानुसार निर्बंध विविध टप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहेत. तर, जनजीवन सुरळीत करण्यासाठी देखील विविध सेवा हळूहळू पूर्ववत केल्या जात आहेत. याचाच एक भाग असलेला राज्याची परिवहन सेवा देखील आता सुरळीत होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वगळता एसटीची राज्यातील सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच होती. मात्र आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने एस.टी. पुन:श्च एकदा हरी ओम करत आहे. आज (सोमवार)पासून सामान्यांसाठीही एसटीची सेवा पूर्ववत होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून एक ट्विट देखील करण्यात आलं आहे.
एस.टी.चा पुन:श्च हरी ओम.. प्रवाशांच्या सेवेसाठी … चला करू प्रवास आपल्या लाडक्या एस.टी. संग….सुरक्षित आणि किफायतशीर…!(स्थानिक जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार) असं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मास्क व निर्जंतुकीकरण याचे लोगे देखील दर्शवले आहेत.
एस.टी. चा पुनःश्च हरी ओम…!
.
.#msrtc#msrtcofficial pic.twitter.com/9tUS5fiBqp— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) June 7, 2021
काही जिल्ह्य़ात निर्बंध शिथिल होत असल्याने एसटीने एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ातही जाता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच करोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. यात पहिल्या चारही स्तरांत मोडणाऱ्या जिल्ह्य़ात प्रवास ई-पासशिवाय करता येणार आहे.
दुसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या ओसरू लागली. त्यातच टाळेबंदीचे नियम कठोर करतानाच प्रवासावरही निर्बंध आले. एसटीची जिल्हा ते जिल्हा सेवा बंदच राहिली. तर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी एसटी चालवण्यात आल्या. परिणामी एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न कमी झाले. सध्या राज्यात एसटीतून दररोज १० हजारच प्रवासी प्रवास करू लागले आणि ३० ते ४० लाख रुपये उत्पन्न मिळू लागले.सोमवारपासून राज्यातील निर्बंध शिथिल होत असल्याने एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळणार आहे.