Maharashtra MLC Election, 12 july: लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. या अनुषंगाने आज विधानपरिषदेत ११ जागांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झालं असून कुणाचे आमदार कुणाच्या उमेदवाराला मत देणार? यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. १२ आमदार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे कुणाचा उमेदवार पराभूत होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

Maharashtra News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा!

09:58 (IST) 12 Jul 2024
Maharashtra MLC Election Live Update: ज्यांना भीती होती, ते हॉटेलमध्ये पळाले – विजय वडेट्टीवार

गैरसमज निर्माण करण्याचे धंदे बंद झालेले दिसत नाहीत. आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहोत. आमच्यावर कुठेही आमदारांना हलवण्याची पाळी आली नाही. ज्यांना मतं फुटतील अशी भीती वाटत होती, ते हॉटेलमध्ये पळाले. त्यांच्या आमदारांवर त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी हॉटेलचा आश्रय घेतला. आम्ही तसं कुठेही केलेलं नाही. आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते.

09:50 (IST) 12 Jul 2024
Maharashtra MLC Election Live Update: अजित पवार गटाचे २ उमेदवार ६ मतांची गरज

तुलनेने अलिकडेच सत्ताधारी गटात सामील झालेले तिसरे सहकारी म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं २ उमेदवार उभे केले आहेत. त्यांनाही विजयासाठी ४६ मतांची गरज आहे. विधानसभेत अजित पवार गटाकडे ४० आमदारांचं संख्याबळ आहे. त्याशिवाय इतर ३ आमदारांचं अजित पवार गटाला पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी ३ मतांची कमतरता आहे.

09:50 (IST) 12 Jul 2024
Maharashtra MLC Election Live Update: शिंदे गटाला ९ मतांची आवश्यकता

सत्ताधारी गटातील दुसरा प्रमुख पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट, अर्थात मुख्यमंत्र्यांचा पक्ष. शिंदे गटानं या निवडणुकीत २ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी ४६ मतांची आवश्यकता असेल. विधानसभेत शिंदे गटाकडे ३७ आमदार आहेत. त्यामुळे वरच्या ९ आमदारांसाठी शिंदे गटाला तजवीज करावी लागेल. ६ अपक्ष आणि बच्चू कडूंच्या दोन आमदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतं दिल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार जिंकून येऊ शकतात.

09:49 (IST) 12 Jul 2024
Maharashtra Vidhan Parishad Election Live Update: भाजपाचे पाचही उमेदवार जिंकून येऊ शकतात!

भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विधानसभेत भाजपाच्या १०३ आमदारांचं संख्याबळ आहे. पाच उमेदवार जिंकून आणण्यासाठी ११५ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे वरच्या १२ मतांसाठी भाजपाला मित्रपक्ष व अपक्षांवर अवलंबून राहावं लागेल. पाच अपक्ष आमदार व इतर ७ आमदारांनी भाजपाच्या पारड्यात मतं टाकल्यास भाजपाचे पाचही उमेदवार जिंकून येऊ शकतात.

09:49 (IST) 12 Jul 2024
Maharashtra Vidhan Parishad Election Live Update: प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी २३ मतं आवश्यक

विधानपरिषद निवडणुकीत ११ जागांसाठी १२ अर्ज आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतील १४ आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ २७४ झालं असून त्यानुसार विधानपरिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक ठरलं आहे.

09:46 (IST) 12 Jul 2024
Maharashtra Vidhan Parishad Election Live Update: अजित पवार गटाचे आमदार मतदानासाठी दाखल

अजित पवार गटाचे आमदार एकाच गाडीतून मतदानासाठी विधानभवनात हजर

09:45 (IST) 12 Jul 2024
Maharashtra Vidhan Parishad Election Live Update: मिलींद नार्वेकर-चंद्रकांत पाटलांची समोरासमोर भेट

ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर यांची विधानभवनाच्या पायऱ्यांवरच भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी नजरानजर झाली. यावेळी मिलींद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटलांना नमस्कार करून त्यांच्याशी संवाद साधला.

09:44 (IST) 12 Jul 2024
Maharashtra Vidhan Parishad Election Live Update: विधानभवनात मतदानाला सुरुवात…

विधिमंडळ परिसरात मतदानाला सुरुवात झाली असून सर्व पक्षांचे आमदार बसमधून मतदानासाठी विधिमंडळात दाखल होत आहे.

09:42 (IST) 12 Jul 2024
Maharashtra Vidhan Parishad Election Live Update: एकनाथ शिंदेंबरोबरच मतदानाला जाणार

एकनाथ शिंदेंचे दोन्ही उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे दोघे विदर्भाचे आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच मतदानाला जाणार – बच्चू कडू

09:41 (IST) 12 Jul 2024
“राजकीय भूकंप झाला तर…”, रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

आता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. “विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार”, असं सूचक विधान रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

09:40 (IST) 12 Jul 2024
“बारावा खेळाडू, मिलिंद नार्वेकरांना कमजोर समजू नका”; संजय शिरसाटांचा इशारा

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक सूचक विधान केलं आहे. “बारावा खेळाडू मिलिंद नार्वेकर यांना कमजोर समजू नका”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

09:38 (IST) 12 Jul 2024
Maharashtra MLC Election Live Update: पंकजा मुंडेंना विश्वास…

विधानपरिषद निवडणुकीत आमचा एकही उमेदवार पडणार नाही, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास

09:33 (IST) 12 Jul 2024
Maharashtra MLC Election Live Update: विधानपरिषद निवडणुकीत बच्चू कडू एकनाथ शिंदेंच्या बाजूने!

आम्ही गेल्या दोन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आत्ताही आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. त्यांनी मतदारसंघासाठी भरपूर निधी दिला आहे. मी स्वत: आणि राजकुमार पटेल एकनाथ शिंदेंसोबतच मतदान करणार आहोत. आमचा पाठिंबा त्यांच्या उमेदवारांनाच असेल. एकनाथ शिंदेंचं एकही मत फुटणार नाही. बाकीच्यांचं मला सांगता येणार नाही.

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

aharashtra News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!