विधान परिषदेच्या निकालात भाजपाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे बेपत्ता झाले असल्याने राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर…
महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे संपर्काबाहेर आहेत. शिवसेनेकडून वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांचा फोन लागत नाही आहे.
आमदारांची राष्ट्रवादीविरोधातील नाराजी
या तिन्ही आमदारांनी वारंवार राष्ट्रवादीविरोधातील आपली नाराजी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री असल्याने त्यांनी विरोध करत तिथे पक्षाचा पालकमंत्री द्यावा अशी मागणी अनेकदा केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं. हीच नाराजी एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी कारणीभूत ठरली असावी असं बोललं जात आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेच्या तीन आमदारांनी अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपुजन समारंभाला गैरहजेरीदेखील लावली होती.
शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमत्री आदिती तटकरे यांना हटवा, अशी माणगी केली होती. ‘कोणीही द्या, पण रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या’ अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागणीची अद्याप फारशी दखल घेतलेली नव्हती.