MNS Manifesto by Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मूलभूत गरजांपासून मराठी अस्मितेच्या मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आलं आहे. ‘आम्ही हे करू’ या नावाने जाहीरनाम्याच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसंच, “आम्ही हे केलं” या पुस्तिकेतून त्यांनी त्यांच्या कामांचा आढावा घेतला.
मनसेच्या चार भागातील जाहीरनाम्यात काय?
राज ठाकरेंनी चार भागात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे.
दुसरा भाग – दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता
तिसरा भाग – राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण
चौथा भाग – मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजिटल जगात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ.
जगातलं सर्वांत मोठं वाचनालयच बाबासाहेब आंबेडकरांचं खरंखुरं स्मारक ठरेल
शिका आणि संघटिक व्हा असा नारा देणारे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं योग्य स्मारक या राज्यात व्हायला हवं. इंदू मिलच्या आवारात जगातील सगळ्यात मोठं पुस्तकांचं वाचनालय बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात चित्रपट चळवळ रुजली पाहिजे
सिनेमा माणसाला समृद्ध करतो आणि बदलत्या जगाचं भान देतो आणि म्हणूनच महाराष्ट्रातील भावी पिढ्यांची सिनेमाबद्दल उत्तम अभिरुची तयार व्हायला हवी. याकरता पद्धतशीर प्रयत्न व्हायला हव्यात. प्रत्येक शहरांत फिल्म क्लब स्थापन झाले पाहिजेत. नॅशनल फिल्म अर्काईव्हसारख्या संस्थांच्या मोठ्या शहरात असायला हव्यात. सिनेमाचं रसग्रहण हा विषय शाळांमध्ये शिकवला जायला हवा, असंही ते म्हणाले.