दापोली: दापोली मतदार संघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे. महायुतीच्या सरकारने येथील आमदार योगेश कदम यांना साडेतीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली ज्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला अशांना कोकणातील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे सांगत तुमच्या लाडक्या आमदार योगेशदादाला येत्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने आमदार बनवा. मी त्यांना नामदार केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोली विधानसभेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचार सभेमध्ये काढले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दापोलीच्या समृद्ध भूमीत योगेश कदम भगवा झेंडा घेऊन उभा आहे. योगेश कदमने दापोली मतदारसंघांमध्ये रेकॉर्ड ब्रेक निधी आणला आहे. त्यामुळे त्याचा विजय पक्का आहे. त्यामुळे २३ तारखेला विजयी फटाके एवढे वाजवा की, त्यांचा आवाज बांद्राच्या मातोश्रीपर्यंत गेला पाहिजे. आदित्य ठाकरे सांगतात, मी रामदास भाई कदमांना काका म्हणायचो मग त्याच काकांच्या पाठीत खंजीर खुपसून वडील मुख्यमंत्री झाले आणि पोरगा काकांचं पर्यावरण मंत्री पद हिसकावून घेत स्वतः नागोबा सारखा पदावर बसला. त्यामुळे कुणी कुणावर टीका करायची याचं भान आदित्य ठाकरे यांना नसून त्यांचं राजकारण म्हणजे पोरखेळ असल्याचा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला. महायुतीच्या सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला त्याचा फायदा झाला.मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यात ही योजना खुपली. योजना बंद पडावी म्हणून ही मंडळी कोर्टात गेली मात्र विजय हा सत्याचा झाला आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाले. या लाडक्या बहिण योजनेमुळे महाराष्ट्र डबघाईला जाईल असे म्हणणारे आता महिन्याला ३ हजार रुपये सरकार आल्यास देऊ असे जाहीरनाम्यात सांगतात,अशा ढोंगी लोकांना लाजा कशा वाटत नाही असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.महाराष्ट्रमध्ये महिलांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही त्या नराधमाला फाशी दिल्या शिवाय राहणार नसल्याचे वचनही त्यांनी यावेळी महिलांना दिले. या सावत्र व कपटी भावांना आता महिला जोडा दाखवून महाविकास आघाडीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नसल्याचे ते त्यांनी यावेळी म्हणाले.

हेही वाचा : EC Writes to BJP and Congress : आचारसंहितेचं उल्लंघन! भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

कोकणातील जनता साधी भोळी आहे. त्यांनी एकदा का शब्द दिला तो दिला. आज दापोली मतदारसंघातील जनता योगेश कदम यांच्यासोबत आहे. योगेश कदमच्या डोक्यावर बर्फ आहे. तो विरोधकांना लादीवर झोपविण्या आधीच करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही असे सांगत थंडा मतलब कोको कोला कंपनीचा उद्योग योगेश कदम यांच्या पाठपुरामुळे कोकणात येऊ शकला.आम्ही धनुष्यबाण चोरला नाही तर तो धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवून वंदनिय बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो. २०१९ ला सुद्धा योगेश कदम हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढले होते आणि आता २०२४ मध्ये सुद्धा या चिन्हावर लढत आहेत हे मतदारांनी लक्षात ठेवले पाहिजे.महायुतीच्या निशाणीवर लढणारा एकही उमेदवार पराभूत होणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत योगेश कदमने दापोली येथील जागृत देवस्थान काळकाई मंदिराचे काम केले आहे.त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला,त्यामुळे त्या देवीचा आशीर्वाद योगेश कदम यांच्या पाठीशी सदैव राहील असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Rahul Gandhi: कुणालाच सुट्टी नाही! निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या राहुल गांधींच्याही बॅगा; पाहा व्हिडिओ

योगेश कदम यांच्याकडे दापोली मतदार संघाचे व्हिजन आहे.तो पुढच्या पाच वर्षात या मिनी महाबळेश्वर दापोलीला पर्यटनाच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही.कोयनेचे पाणी कोकणात खेळवायचे हे रामदासभाईंचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून,त्याला केंद्राची मान्यताही मिळाली आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला १० लाख कोटी रुपये दिले आहेत.आम्ही कोकण विकास प्राधिकारण मंडळ स्थापन केल्यामुळे कोकणचा बॅकलॉग यापुढे लवकरच भरून निघेल. जे-जे कोकणाच्या विकासासाठी करायचे आहे ते सर्व केल्याशिवाय महायुती सरकार गप्प बसणार नसल्याचेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कोकणातला तरुण यापुढे परदेशात जाऊ नये म्हणून योगेश कदम उद्योग निर्मितीवर जास्त भर देत आहेत. कोकणात चक्रीवादळ झाले त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मात्र पहिली मदत ही मी पाठवली. लोकांच्या घरावर कौले मी बसवली.तुम्हाला गरिबांची काय जाण असणार असा टोलाही उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी लगावला.उद्धव ठाकरे यांना फक्त बॅगा खोके पुरत नाहीत तर कंटेनर लागतो असे राज ठाकरे म्हणत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. त्यावेळी एकच हसा पिकला.शिवसेना ही मोठी रामदास भाईंसारख्या कार्यकर्त्यांमुळे झाली आहे. अशा अनेक कार्यकर्त्यांचा तुम्ही अपमान केला आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली त्यांना कोकण वासिय थारा देणार नाहीत,असे सांगत विरोधकांची मशाल ही क्रांतीची नसून घराघरात आग लावण्याची आहे. रामदासभाई तुम्हाला आम्ही राजकारणातून कधीही निवृत्त होऊ देणार नाही. तुम्ही कोकणचे भाग्यविधाते आहात. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र या, आपला शत्रू ओळखा व त्याला चारी मुंड्या चित करा असे सांगत,योगेश कदम यांना भरघोस मतांनी विजयी करा मी विजय मिरवणुकीचा गुलाल उधळायला दापोलीत नक्की येईन असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.