अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात चर्चेत असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये अखेर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीला या मतदारसंघात मोठा धक्का बसला. माजी आमदार राहुल जगताप यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी मागितली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतरही ते शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचे संकेत मिळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेले अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली.
हेही वाचा >>> माजी मुख्यमंत्र्यांचा नातू कारंजातून विधानसभेच्या मैदानात
यामुळे माजी आमदार राहुल जगताप हे नाराज झाले. त्यांनी समर्थकांचा मेळावा पिंपळगाव पिसा या ठिकाणी घेतला होता त्यावेळी सर्व समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करायचा असे जाहीर केले होते. त्यानुसार आज श्रीगोंदा शहरामध्ये भव्य जाहीर सभा व रॅली काढून माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. राहुल जगताप म्हणाले की, माझी उमेदवारी मुंबईवरून नाही तर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने ठरवली आहे. यामुळे मी जनतेचे ऐकणार व अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार. निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला जनतेतून संधी मिळेल असा मला विश्वास आहे असे श्री जगताप यावेळी म्हणाले.