Mahadev Jankar : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज (१८ नोव्हेंबर) निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या काही तासांत प्रचाराला वेग आला आहे. खरं तर दिल्ली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनीही राज्यातील विविध मतदारसंघात येऊन प्रचार केला. या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं.

या अनुषंगानेच आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची भूम शहरात जाहीर सभा पार पडली. रासपचे उमेदवार राहुल घुले यांच्या प्रचारासाठी जानकर यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना महादेव जानकर यांनी एक मोठा दावा केला आहे. “मी आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाही. मात्र, पाच मिनिटं का होईना देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis: ‘अजित पवारही लवकरच भगवे होणार’, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विचारधारेवर काय म्हटले?

महादेव जानकर काय म्हणाले?

“जनतेला माझी कळकळीची विनंती आहे. ही संधी गमाऊ नका. या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष नक्की खातं खोलणार आहे. आपले आमदार निवडून येणार आहेत. मात्र, तुमचा राज्यात पहिला मान असणार आहे. का? तर तुम्ही मला एक नंबरचं मतदान एक दिलं होतं. तुमच्यामुळे मला मान्यता मिळाली. आज देशभर बोलतो तर भूम परांड्याच्या जनतेच्या जोरावर बोलतो. जेव्हा माझा झेंडा घ्यायला कोणी नव्हतं, तेव्हा तुम्ही मला मतदान दिलं होतं. त्यामुळे एवढ्या वेळी तुम्ही मला संधी द्या. मी आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाही. मात्र, पाच मिनिटं का होईना देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. आई शपथ सांगतो. मुख्यमंत्री कधीच होणार नाही. पण पंतप्रधान झाल्यानंतर भूम परांड्यातून हेलिकॉप्टर घेऊन नक्की फिरेल. ते देखील झेंडा आणि चिन्हही माझं असेल. दुसऱ्याच्या पक्षावर नाही”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

‘भाजपा आणि काँग्रेस गद्दार पक्ष’

“आज आपण पाहिलं तर भाजपा गद्दार पक्ष आहे आणि काँग्रेसही तसाच पक्ष आहे. काँग्रेस देखील चांगलं नाही. त्यामुळे तुमचं वाटोळं आहे. आज सांगतात आम्ही पाणी दिलं, वीज दिली, विमा दिला. लाडक्या बहि‍णींना पैसे दिले. मग हे पैसे काय त्यांचे आहेत का? ते पैसे त्यांचे नाहीत. हे सर्व पैसे जनतेचे आहेत. मात्र, निवडणूक आल्यानंरच मुख्यमंत्री शिंदे यांना लाडक्या बहि‍णींची कशी आठवण झाली? आधी पाच वर्ष कुठे होतात? तेव्हा कुठे गुवाहाटीला गेला होतात का? भारतीय जनता पक्ष काय करतो तर माणसात माणूस ठेवत नाही आणि पक्षात पक्ष ठेवत नाही. शरद पवारांनी पक्ष काढला तर त्यांचा घरात फोडाफोड केली”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.