मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी बंडखोरीला अक्षरश: उधाण आले. सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून महाविकास आघाडी किंवा महायुतीतील आपल्या मित्रपक्षाविरोधात अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत असून पुढील पाच दिवसांत बंडोबांना शांत करण्याचे खडतर आव्हान पक्षनेत्यांना पार पाडावे लागणार आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा शेवटपर्यंत घोळ सुरू होता. मतदारसंघ मित्र पक्षाला गेल्याने काही जणांनी बंडखोरीचा मार्ग पत्करला. याशिवाय उमेदवारी नाकारलेल्या काही नेत्यांनीही बंडखोरी केली आहे. २०१९च्या तुलनेत यावेळी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. ‘शिस्तप्रिय’ मानल्या जाणाऱ्या भाजपलाही बंडखोरीचा फटका बसला आहे. वर्षानुवर्षे पक्षाचे निष्ठावान समजले जाणारे गोपाळ शे्टटी यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. शिवसेना (ठाकरे) व शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांमध्येही बंडखोरी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ (पान ८ वर) (पान १ वरून) शिंदे यांच्या विरोधात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या (ठाकरे) वाट्याला गेला असताना तेथे काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली आहे.

हेही वाचा :महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंनी दिली वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

विदर्भात प्रमुख पक्षांना फटका

अमरावतीतील मेळघाटमधून केवलराम काळे यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांनी बंडाचे निशाण फडकविले. चंद्रपूर मतदार संघात काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांनी रॅली काढत नामांकन अर्ज दाखल केला. काँग्रेस बंडखोर राजू झोडे यांनीही अर्जही दाखल केला. अपक्ष आमदार जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी दिल्याने नाराज झालेले ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडखोरी करित अर्ज दाखल केला. बल्लारपुरातून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराज डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने नाराज भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वंचितकडून नामांकन भरले. काँग्रेस बंडखोर डॉ. चेतन खुटेमाटे यांनी अपक्ष नामांकन अर्ज सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवार जाहीर करताच पक्षात फूट पडली. नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सर्वाधिक काळ राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेले वसंतराव नाईक यांचे चूलत नातू ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना पूसदमधून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी कारंजा मतदारसंघातून समनक जनता पक्षाच्यावतीने अर्ज दाखल केला.

उत्तर महाराष्ट्रात बंडखोरीचे वारे

शिवसेनेच्या (शिंदे) राजश्री अहिरराव यांनी देवळालीमध्ये तर माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडोरीमध्ये बंड केले आहे. नाशिक मध्य मतदारसंघात प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील अपक्ष म्हणून उभ्या राहणार आहेत. इगतपुरीत ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित आणि शिंदे गटाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज भरला आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात समाजवादी पक्षाविरोधात काँग्रेसचे शहरप्रमुख एजाज बेग यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. जळगाव शहरच्या जागेवर ठाकरे गटात असलेले माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

हेही वाचा :श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

लक्षवेधक बंडखोर

● भाजपच्या माजी खासदार हिना गावीत यांची अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी

अजित पवार गटाचे समीर भुजबळ नांदगावमधून रिंगणात

● भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा बोरिवलीतून उमेदवारी अर्ज

● नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये शिंदे गटाचे विजय नाहटा यांचे भाजपविरोधात बंड

● अलिबागमध्ये भाजपचे दिलीप भोईर यांचा शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात अर्ज

● पुण्याच्या कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या कमल व्यवहारे आणि पर्वतीमध्ये आबा बागुल यांचे बंड