सातारा : आज लोकांना प्रगतीच्या मागे जायचे असल्याने फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात महायुतीचे उमेदवार विजयी होतील. लोकांना विकासकामे अपेक्षित असून महायुती सरकारच्या काळात ती झालेली दिसत आहेत. महाविकास आघाडीने सत्ता असताना काहीही केले नाही. मशाल घेऊन मशालवाल्यांनी कुठे कामे केली हे शोधावे लागत आहे. तुतारीवाल्या पवारांनी केवळ नुसती घोषणाबाजी केली आहे. नुसते हे करणार ते करणार, काहीच केले नाही. मात्र त्यांच्याकडून यापुढे अपेक्षा ठेवणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, असे सांगून महाराष्ट्रात यावेळीही महायुती सत्तेत येईल. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही उदयनराजेंनी व्यक्त केला.
साताऱ्यात आज प्रसारमाध्यमांशी खा. उदयनराजेंनी संवाद साधला. ते म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची केंद्रात व विविध राज्यात दीर्घकाळ सत्ता होती. याकाळात चांगल्या घोषणा झाल्या तरी त्याचा वापर हा मते मिळवण्यासाठी झाला. गरीब, जवान, किसान, महिला, तरुण यांच्यासाठी मागील ६० वर्षांत काहीच झाले नाही. मागील १० वर्षांत परिवर्तन घडले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता आली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे विचार मोदींनी आचरणात आणल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.
हेही वाचा – Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. त्यामुळेच स्वराज्याची स्थापना झाली आहे. राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा, असा विचार असणारा राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकशाहीचा पाया रचण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रीय काँग्रेसकडे स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्ता असताना याकाळात ‘गरिबी हटाव देश बचाओ, जय जवान जय किसान’ या चांगल्या घोषणा झाल्या. या घोषणा चांगल्या असल्या तरी त्याचा वापर हा मते मिळवण्यासाठी झाला. खा. शरद पवार यांनी केवळ घोषणाबाजी केली. नुसते हे करणार अन् ते करणार काहीच केले नाही. ऐन तारुण्यात त्यांनी काही केले नाही. आता मात्र यापुढे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली.