2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates, 21 November 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल (२० नोव्हेंबर) पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला असून मागच्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे वाढलेले मतदान नेमके कुणाच्या पारड्यात जाणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले आहेत. अनेक एक्झिट पोल्सनी महायुतीला बहुमत प्राप्त होईल, असा अंदाज वर्तविला आहे. तर काही पोल्सनी राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. एक्झिट पोल्सनंतर आता राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. महायुतीने एक्झिट पोल्सवरून आनंद व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीने निकालाच्या दिवसाची वाट पाहू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
2024 Maharashtra Assembly Election Live Updates, 21 November 2024 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह
नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ - ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार
नाशिक : मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मतदानात ६.५२ टक्क्यांनी वाढ होऊन ते ६९.१२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
"नाना पटोलेंनी ते मुख्यमंत्री होतील असं कुठंही म्हटलेलं नाही", विजय वडेट्टीवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
"नाना पटोले यांनी मी मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार निर्णय घेऊ, माध्यमांनी प्रश्न विचारल्याने संजय राऊतच्या तोंडून असा शब्द निघाला असेल. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असं कधीच म्हटलेलं नाही", असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सुहास कांदे, समीर भुजबळ यांसह २०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे
नाशिक : नांदगाव मतदारसंघात उमेदवारांमधील वाद, समर्थकांची धक्काबुक्की प्रकरणी चार, वाहनात पैसे आढळल्याने दोन तर, गाडीत मद्याच्या बाटल्या सापडल्याने एक असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निकालानंतर राजकीय घडामोडी वाढणार; महाविकास आघाडीची उद्या तातडीची बैठक
विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. राज्यात कोणाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुती? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. उद्या निकाल समोर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या महाविकास आघाडीची बैठक पार पडणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीची उद्या बैठक आहे. २५ तारखेला नवीन सरकार येणार आहे. आम्ही मुंबईत राहू आणि राज्यपालांकडे जाऊ', अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, "गरज पडल्यास..."
"निकाल लागल्यानंतर आम्ही सर्वजण पाहू की आम्ही महायुती म्हणून सरकार बनवू शकतो का? किंवा गरज पडली तर आम्ही अपक्षांना बरोबर घेऊ आणि सरकार बनवू. तसंही निवडणुकीत १० ते १५ अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांच्या या विधानाच्याआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनीही सरकार स्थापन करण्यासंदर्भात मोठं विधान केलं होतं. त्यामुळे सध्या निकाल जाहीर होण्याच्या आधीच पडद्यामागे राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पिंपरी: विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार आमदार अण्णा बनसोडे यांचा दावा
पिंपरी: पिंपरी विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा दावा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
SSC and HSC Exam Time Table: मोठी बातमी! १०वी, १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, असे आहे वेळापत्रक
निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा सुरू होईल. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. याबरोबरच इयत्ता बारावी व्होकेशनल अभ्यासक्रमासाठीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.दरम्यान, सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या https://mahahsscboard.in/mr या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Sanjay Shirsat on CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार; शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितले..
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही आणि त्यांना दुय्यम भूमिका निभावावी लागली तर काय करणार? असा प्रश्न शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील. निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्याबरोबर गेले तर? असा प्रश्न विचारला असताना संजय शिरसाट म्हणाले की, शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्याबरोबरच जाऊ.
मुख्यमंत्रीपद, वाढलेली मतदान टक्केवारीवर, फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले
नागपूरही : वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात त्याचा महायुती आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल , असे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे व्यक्त केले.
विक्रमी मतदानामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला; ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम?
वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत एकूण सरासरी ६९. २९ टक्के मतदानाची नोंद झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हाच आकडा ६४.८५ असा होता. जवळपास पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याची ही तुलनात्मक आकडेवारी सांगते. अधिकचे मतदान कोणासाठी लाभदायी, याची चर्चा सुरू झाली आहे.
Devendra Fadnavis on Voting Turnout: मतदानाचा वाढलेला टक्का कुणाला लाभदायक ठरणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला फायदेशीर ठरणार? अशी चर्चा असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा तेव्हा भाजपा आणि मित्रपक्षांचा फायदा होतो. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल आणि महायुतीचे सरकार स्थापन होईल.
नागपूर : काँग्रेसच्या आमदाराशी दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतांचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? यवतमाळात सर्वच मतदारसंघात काट्याच्या लढती
यवतमाळ – सात विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी जिल्ह्यात मतदान झाले. सहा मतदारसंघात यावेळी मतांचा टक्का वाढला आहे. उमरखेडमध्ये घटला आहे. अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६९.०२ टक्के मतदान झाले. वणीमध्ये सर्वाधिक ७४.८७ तर यवतमाळमध्ये सर्वात कमी ६२.४० टक्के मतदान झाले.
कल्याण डोंबिवलीतील मतदारांनी रचला मतदान वाढीचा अध्याय, कल्याणमधील कमी मतदानाबद्दल निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती खंत
वडगाव शेरीत मतदारांचा उत्साह; दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी
पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील वडगाव शेरी, खराडी, येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी परिसरातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. सकाळी नऊपर्यंत मतदान कमी झाले हाेते. दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली. वडगाव शेरी मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ५०.४६ टक्के मतदान झाले.
चिंचवड, भोसरीत उत्साह, तर पिंपरीत निरुत्साह
पिंपरी : शहरातील चिंचवड आणि भाेसरी विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदानाचा हक्क बजाविला, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह दिसून आला. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू हाेती.
Assembly Elections 2024 Exit Poll: महाविकास आघाडीला १६०-१६५ जागा मिळणार, संजय राऊतांना विश्वास
महाविकास आघाडीला १६०-१६५ जागा मिळणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर बातमी वाचा
भाजप आमदार दादाराव केचेंवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ? पण, केचे म्हणतात…
वर्धा : विधानसभा निवडणुकीत आर्वी भाजपतील बंडखोरी राज्यभर गाजली. अखेर अमित शहा यांच्या दरबारात ती थंडावली, असे येथील विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी अर्ज परत घेतल्यानंतर म्हटल्या गेले.
आता वीस रुपये घ्या, जिंकून आल्यास नोट दाखवून हजार न्या…गोंदियात उमेदवाराचे अफलातून आमिष…
गोंदिया : देशात आणि राज्यात महागाईने गाठलेला उच्चांक बघता वीस रुपयांच्या नोटेला आर्थिकदृष्ट्या फार महत्व नाही.
सविस्तर वाचा...
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आता निकाल लागण्याआधीच महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मविआचे सरकार स्थापन होईल, असे नाना पटोले म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असे आपण मानत नाही. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. नाना पटोले यांना जर मुख्यमंत्री बनविण्याचे काँग्रेसने ठरविले असेल तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी तसे जाहीर करावे, असेही आवाहन संजय राऊत यांनी केले.
राज्यभरातील कारागृहात तब्बल ७९ टक्के कच्चे कैदी; शासनावर वाढतोय आर्थिक भार
नागपूर : राज्यभरातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले असून यामध्ये तब्बल ७९ टक्के कच्चे कैदी (न्यायाधीन कैदी) आहेत.
मूळ प्रश्न झाकोळले, फक्त काय‘द्या’चं बोला!
चंद्रपूर : विकासकामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, विद्यार्थी प्रश्न, प्रदूषण, मानव-वन्यजीव संघर्ष, औद्योगिकीकरण, महिलांचे-युवकांचे प्रश्न, असे मूळ आणि ज्वलंत प्रश्न या निवडणुकीत झाकोळले; केवळ पैसा, भेटवस्तू, शाकाहारी व मांसाहारी जेवणावळ, मद्यपार्टी, यावरच प्रचारादरम्यान उमेदवारांचा भर दिसून आला.
पर्वतीत नवमतदारांसोबत ज्येष्ठांची साथ कुणाला.. कोण ठरणार निर्णायक ?
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. सकाळी नऊनंतर मतदान केंद्रावरील गर्दी आणखी वाढल्याचे दिसून आले. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक होते. पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रशासनाने महिला मतदार केंद्रासोबत आदर्श मतदान केंद्रांचे नियोजन केले.
चिंचवडमध्ये वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?
पिंपरी : राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरातील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पिंपरीतील शेवटच्या टप्प्यातील मतदार कोणाला धक्का देणार?
पिंपरी : चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांत सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसत असताना दुसरीकडे झोपडपट्टीबहुल असलेल्या पिंपरी मतदारसंघात मतदारांमध्ये मात्र निरुत्साह दिसला.पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शीलवंत यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानातही पुणेकरांचे ‘एक ते चार’! प्रक्रिया शांततेत, टक्का वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांत कसूर नाही
पुणे : मतदान केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यावरून झालेले वाद आणि मतदान यंत्र काही काळ बंद पडण्याचा अपवाद वगळता पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली. मतदान केंद्रांबाहेर सकाळी लागलेल्या रांगा, दुपारी १ ते ४ मंदावलेला वेग, मतदान केंद्रांबाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग, सुसज्ज प्रशासकीय व्यवस्था आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त असे आश्वासक चित्र मतदान प्रक्रियेवेळी दिसून आले.
भोसरीत समाविष्ट गावातील कौल निर्णायक?
भोसरी विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदान झाले. समाविष्ट भागातील चऱ्होली, मोशी, चिखली, दिघी, बोऱ्हाडेवाडी केंद्रावर सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले.
सविस्तर वाचा
दिग्गजांच्या मतदारंघातील वाढलेले मतदान कोणाच्या पत्थ्यावर ?
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी पार पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी चार टक्क्याने तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात मागच्या निवडणुकीच्या तुलनेत पाच टक्के अधिक मतदान झाले.
Praniti Shinde: “गद्दार प्रणिती शिंदेंचा धिक्कार असो..”, शिवसेना ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन
सोलापूर दक्षिण विधानसभेत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापुरात प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेल्या फलकाला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र पिता - पुत्रीने अचानक अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत.